मुंबई : सैराट चित्रपटाने फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांना याड लावलं आहे. अगदी सातासमुद्रापारही सैराट सिनेमाची दखल घेण्यात आली आहे. मात्र या सिनेमाची कथा आपल्या कादंबरीवरुन चोरल्याचा दावा कादंबरीकार नाथ माने यांनी केला आहे.


 
'बोभाटा' या आपल्या कादंबरीवरुन नागराज मंजुळे यांनी 'सैराट' चित्रपटाची कथा ढापल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.

 
माने सध्या कामोठे परिसरात राहत असून मूळ साताऱ्यातील माण तालुक्यातल्या धकटवाडीचे आहेत. 2010 मध्ये त्यांनी 'बोभाटा' कादंबरी लिहिली होती. सुप्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांनी या कादंबरीची प्रस्तावना लिहिली आहे. एका खेडेगावातील आंतरजातीय प्रेमसंबंधांची कथा या कादंबरीत चितारण्यात आली आहे.

 
नाथ माने यांना आपल्या कादंबरीवर चित्रपट काढायचा होता. झी टॉकिज आणि एस्सेल ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी न्यायालयात केला आहे. मात्र वारंवार इमेलद्वारे संपर्क साधूनही कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावल्याचं म्हटलं आहे.