मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास 5 महिने पूर्ण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाने अनेक वळणं घेतली होती. अशातच आता या प्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. परंतु, अद्याप सुशांतच्या मृत्यू संदर्भात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. ज्यामुळे सुशांतचे कुटुंबिय मानसिक तणावाचा सामना करत आहेत.


सुशांतच्या बहिणी सुशांतच्या मृत्यूनंतर सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून न्याय मागत आहेत. अशातच श्वेता सिंह किर्तिने आपलं ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने पुन्हा एकदा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताही खुलासा न झाल्यामुळे तणावाचा सामना करत असल्याचं अधोरेखित केलं आहे. श्वेता सिंहने फोटो शेअर करत सांगितलं आहे की, 'मी माझं दुःख कमी करण्यासाठी एक नवा मार्ग निवडला आहे.' पुढे त्यांनी सांगितलं की, 'त्या मुलांना भगवद गीता शिकवत आहे.' त्या म्हणाल्या की, मानसिक तणाव, निराशा यांना यामार्फत सांभाळता येऊ शकतं. जेव्हा आपण तणावात असतो, वेदनांमधून जात असतो, त्यावेळी यांचा सामना करण्यासाठी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आपल्याला देवाकडून मिळते. ते आपल्याला योग्य रस्ताही दाखवतात. तसेच विश्वासही देतात की, असत्यावर नेहमी सत्याचाच विजय होतो.'





दरम्यान, 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. परंतु, सुशांतनं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा त्याचे कुटुंबिय आणि चाहते यांच्याकडून केला जात होता. त्यानंतर बिहार पोलीस, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु, याप्रकरणी काही समोर आलं नाही. ज्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. सीबीआय याप्रकरणी सध्या तपास करत असून सुशांतच्या कुटुंबियांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला त्याच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं होतं. त्यानंतर रिया चक्रवर्तीवरही कारवाई करण्यात आली होती. परंतु, अद्याप सुशांतच्या मृत्यूबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.


महत्त्वाच्या बातम्या :