मुंबई : अखेर थिएटरवाल्यांची प्रतीक्षा संपली. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेली थिएटर्स आता खुली होणार आहेत. राज्य सरकारने हा निर्णय अखेर घेतला आहे. 50 टक्के प्रेक्षकसंख्या घेऊन थिएटर्स सुरू करायला हरकत नाही असं राज्य सरकारने म्हटलं आहे. या निर्णयामुळे मनोरंजनसृष्टीत समाधानाची लाट आहे. असं असलं तरी अचानक हा निर्णय़ घेतल्यामुळे काही संभ्रमही निर्माण झाले आहेत.


थिएटर्स खुली होणं ही खूपच आनंदाची बातमी आहे. पण थिएटर चालू करण्याचा निर्णय़ असा अचानक का घेतला असा ही प्र्श्न काहींना पडला आहे. सर्वसाधारणपणे 15 दिवस आधी ही बाब जाहीर केली जाते. त्यामुळे थिएटरवाल्यापासून चित्रपट नाटकवाले तयारी करू लागतात. थिएटर्स सुरू झाल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या याची चाचपणी होते. आता त्याची घाई होईल असा एक सूर आहे. त्यातही सिनेमागृहवाल्यांसाठी गोष्टी तुलनेनं सोप्या आहेत. कारण तिथे केवळ सिनेमा लाावण्याची बाब येते. कोणता सिनेमा कधी लावायचा.. जुना सिनेमा लावायचा तर कोणता आदी गोष्टी यथावकाश होतील. पण नाट्यनिर्माते जरा संभ्रमात पडले आहेत. याबाबत निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी आपली बाजू एबीपी माझासमोर मांडली.


संतोष काणेकर म्हणाले, 'थिएटर उघडली जाणं चांगलंच आहे. पण हा निर्णय घाईचा आहे असं वाटतं. कारण थिएटर सुरू करताना 50 टक्के प्रेक्षकसंख्येचा नियम करणं प्रेक्षकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहेच. पण नाट्यव्यवसायाचा विचार करुन काही नियमावली-एसओपी असायला हवी. म्हणजे, दिवसाला एका थिएटरमध्ये किती प्रयोग करायचे.. ते केल्यानंतर थिएटर सॅनिटाईज करायचं की करायचं नाही.. येणाऱ्या प्रेक्षकांचं तापमान चेक करून सॅनिटायझर लावायचा असं जरी ठरवलं तरी एक माणूस थिएटरमध्ये सोडायला एक मिनिट डाईल. 100 प्रेक्षक जरी धरले तरी दीड दोन तास त्यातच जातील. शिवाय, थिएटरमध्ये आत जी माणसं असतील त्यांना पीपीई किट घालायचं की कसं.. अशा अनेक गोष्टी आहेत. दर प्रयोगानंतर थिएटर सॅनिटाईज करायचं ठरलं तरी ते कोण करून घेणार अशा अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं, चित्रिकरण सुरू करायला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने एक नियमावली तयार केली होती. तशी ती आतही हवी. जेणेकरून सगळीकडे त्याचं पालन होईल. '


काणेकर हे निर्माता संघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना विचारात घ्यायला हवं. हीच बाब सिनेमागृहांनाही लागू होईल. याशिवाय, एक खुर्ची सोडून एक प्रेक्षक बसवायचा ठरवला तरी एखादं कुटुंब थिएटरमध्ये आलं तर त्यांची आसनव्यवस्था कशी असेल हेही बघायला हवं. कारण, सगळं सुरू होतं आहे हे चांगलीच बाब आहे, पण काळजी न घेतल्याने उगाच पुन्हा मनोरंजनसृष्टी कोणतंही कारण बनू नये असं वाटतं, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका सिनेमाघराच्या तिकीट काऊंटरवर बसणाऱ्या एकाने सांगितलं.