मुंबई : बहुप्रतीक्षित बाहुबली चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात 'बाहुबली : द कन्क्ल्युजन' येत्या 28 एप्रिलला प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मात्र दिग्दर्शक राजमौली यांच्या डोक्यात पुढील सिनेमाची गणितं शिजायला सुरुवात झाली आहे. राजमौलींचा आगामी चित्रपट महाभारतावर आधारित असून बिग बी, आमिर खान यांची निवड झाल्याची माहिती आहे.


अमिताभ बच्चन, आमिर खान, मोहनलाल या आघाडीच्या अभिनेत्यांना एकत्र आणून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. 2018 मध्ये याच्या निर्मितीला सुरुवात होईल. 400 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. तमिळ, तेलुगू, हिंदी या तीन भाषेत चित्रपटाची निर्मिती होईल.

'सध्या माझं पूर्ण लक्ष बाहुबलीच्या दुसऱ्या भागावर. दुसरे कोणतेही विचार माझ्या डोक्यात नाहीत. बाहुबलीनंतर लगेचच महाभारतावर चित्रपट आणण्याची शक्यता कमी आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने त्याचे कलाकार, तंत्रज्ञ यांची जुळवाजुळव करायला वेळ लागेल.' असं राजमौली म्हणाले. आमिर खानची भेट घेतल्याचं राजमौली यांनी स्पष्ट केलं. या विषयावर आमिर सकारात्मक आहे, असंही ते म्हणाले.

येत्या 28 एप्रिलला ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाहुबलीचा पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली.

एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र यावेळी त्याच्या दहा टक्केही कलेक्शन बॉक्स ऑफिसवर होऊ शकलेलं नाही. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

संबंधित बातम्या


PHOTO: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…


‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट


रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर


VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज