मुंबई : महाराष्ट्रातील विविध योजनांच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड जगतातील मोठ्या चेहऱ्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतकी व्यवसायात बस्तान बसवता यावं म्हणून सहकार्य करण्यासाठी अक्षय कुमार, शाहरुख यासारख्या सेलिब्रेटींना पाचारण करण्याची तयारी फडणवीस सरकारने सुरु केली आहे.
विशेषतः पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालयाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी सुपरस्टार्सची मदत घेतली जाणार आहे. शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, प्रियंका चोप्रा, ऐश्वर्या राय यासारख्या सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांचा यात समावेश असेल. अनेकांना पत्र लिहून विचारणा करण्यात आली असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्याचं जानकर म्हणाले.
शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी जानकरांनी शाहरुख खान आणि इतर काही कलाकारांना योगदान देण्याची विनंती केली आहे. प्राण्यांसाठी मोबाईल व्हॅन्स, भटक्या कुत्रे आणि मांजरींसाठी लसीकरण, देशी गायींसाठी निवारा, ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांसाठी उद्योग योजना यासारखे प्रकल्प सुरु करण्याची पदुम मंत्रालयाची तयारी आहे.
नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय स्थापन करण्यासाठी एका एनजीओने टाटा ट्रस्टच्या सोबतीने जागेची निवड केल्याचं पदुम मंत्री महादेव जानकर यांनी 'पीटीआय'ला सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासारखे शेतीशी पूरक व्यवसाय सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
ज्याप्रकारे अक्षयकुमारने शहीद जवानांसाठी अॅप सुरु करुन आर्थिक मदत जमा केली, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही आर्थिक सहाय्य करावं, असं जानकर म्हणाले. अक्षयने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मदत केल्याचं आणि भूमीहीन शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करता यावी, म्हणून मुंबईजवळ 5 एकर जमीन खरेदी केल्याचंही जानकरांनी सांगितलं.