Laadla Shooting Horrer Incident : बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचं निधन रहस्यमय झालं आहे. या यादीत 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) यांचा समावेश आहे. 'लाडला' (Laadla) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिव्या भारती यांचे निधन झाले आहे. त्यांनी 90% या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. पण त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. लोकांनी हा सिनेमा रिलीज न करण्याचं सांगितलं. पण निर्मात्यांनी मात्र हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी श्रीदेवी (Sridevi) यांच्यासोबत संपर्क साधला. आज 'लाडला' रिलीज होऊन 30 वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. पण या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी यांच्यासोबत एक भयानक घटना घडली होती. सेटवरील मंडळीना दिव्या भारती यांचा आत्मा भटकत असल्याचं वाटत होतं. त्यामुळे श्रीदेवी यांनी सेटवर गायत्री मंत्र (Gayatri Mantra) म्हणायला सुरुवात केली.


श्रीदेवीसोबत घडलेली भयानक घटना 


श्रीदेवी आणि दिव्या भारती यांच्या अनेक गोष्टी समान होत्या. दोघी फक्त सौंदर्यातच नव्हे तर टॅलेंटमध्येही एकमेकांना टक्कर देत होत्या. 'लाडला'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर श्रीदेवी यांनी लगेचच सिनेमा करण्यास होकार दिला. 'लाडला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सेटवर अंगावर शहारे आणणारी एक घटना घडली होती. दिव्या भारती ज्या सीनचा डायलॉग बोलताना थरथर कापत होत्या. त्याच सीनचा डायलॉग बोलताना श्रीदेवीदेखील थरथर कापत होत्या. त्यामुळे सेटवर सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. 


दिव्या भारती यांचा आत्मा सेटवर भटकतोय असं क्रू मेंबरला वाटत होतं. त्यामुळे श्रीदेवी यांच्यासह सेटवरील सर्व मंडळींनी सेटवरच गायत्री मंत्र (Gayatri Mantra) म्हणायला सुरुवात केली. नारळ फोडून त्यांनी सेट शुद्ध केला. 'लाडला' या सिनेमात असणाऱ्या रवीना टंडन (Raveena Tondon) यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,"दिव्या भारती यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा शूटिंग सुरू झाली तेव्हा सेटवरील सर्व मंडळी भावूक झाले होते. दिव्या भारती यांच्या निधनाने श्रीदेवी यांनी त्यांची जागा घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. 


रवीना टंडनचा मोठा खुलासा


रवीना टंडनने खुलासा करत म्हटलं होतं की,"मी, दिव्या भारती आणि शक्ति कपूर औरंगाबादमध्ये एक सीन शूट करत होतो. या सीनमध्ये दिव्या भारती मला नोकरीवरुन काढून टाकते, असा सीन होता. या सीनच्या शूटिंगदरम्यान एक डायलॉग म्हणताना दिव्या भारती वारंवार अटकत होत्या. त्यामुळे बऱ्याचदा रिटेक घ्यावं लागलं होतं. त्यानंतर सहा महिन्यांनी श्रीदेवी यांनी या सिनेमाचं शूटिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी श्रीदेवीदेखील हाच डायलॉग बोलताना अडखळत होत्या. त्यामुळे माझ्यासह सेटवरील सर्व मंडळीच्या अंगावर शहारे आले". 'लाडला' या सिनेमाला 25 मार्च 2024 रोजी 30 वर्ष पूर्ण झाले. या सिनेमात श्रीदेवी, अनिल कपूर आणि रवीना टंडन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


दिव्या भारती यांचे 5 एप्रिल 1993 मध्ये त्यांच्याच अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून निधन झाले होते. दिव्या भारती यांनी आपल्या करिअरमध्ये एकपेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'दिल का क्या कसूर','शोला और शबनम','दीवाना','रंग'सारख्या एकापेक्षा एक सिनेमांत दिव्या भारती यांनी काम केलं आहे. 1990 ते 1993 पर्यंत दिव्या भारती यांनी हिंदीसह तामिळ, तेलुगू सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.


संबंधित बातम्या


Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणारी दिव्या भारती! मृत्यूच्या रात्री अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं...?