Jai Bhim : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुर्याचा (Suriya) 'जय भीम' (Jai Bhim) हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटावर कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'जय भीम' हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 


काय आहे प्रकरण? 
व्ही कुलंजियाप्पन नावाच्या व्यक्तीने जय भीम चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. जय भीम चित्रपटाच्या निर्मात्यांनी वचन दिल्याप्रमाणे कोणतीही रॉयल्टी दिली नाही, असा आरोप कुलंजियप्पन यांनी केला आहे.  चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्ही कुलंजियाप्पन यांच्या कथेचा वापर केला आणि त्याबद्दल पैसे दिलेले नाहीत, असा आरोप जय भीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर व्ही कुलंजियाप्पन यांनी केला. व्ही कुलंजियाप्पन यांनी कॉपीराइट कायद्यांतर्गत जय भीम चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


50 लाख रुपये देण्याचं दिलं होतं वचन 
व्ही कुलंजियाप्पन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये जय भीम चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्ही कुलंजियाप्पन यांची भेट घेतली होती. त्यावेळी व्ही कुलंजियाप्पन यांची कथा चित्रपटामध्ये वापरण्यासाठी त्यांना 50 लाख रॉयल्टी देण्याचे वचन निर्मात्यांनी केले होते. पण चित्रपट निर्मात्यांनी हे पैसे कुलंजियाप्पन यांना दिले नाहीत. कुलंजयप्पन यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आश्वासनाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. चित्रपटात आमच्या समाजाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे, असेही कुलंजियप्पन यांनी सांगितलं. 


सुर्याचा 'जय भीम' हा चित्रपट 2 नोव्हेंबर 2021 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर या चित्रपटातील सूर्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले.  'जय भीम'  या चित्रपटात सूर्यासोबतच  प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: