राहुल भातणकर हा मूळचा संकलक. अनेक वर्षं संकलन करताना आलेला अनुभव गाठीशी घेऊन त्याने आता दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. त्याचा हा दुसरा चित्रपट. यापूर्वी याचा टाईम बरा वाईट हा चित्रपट येऊन गेला. आता भय या चित्रपटाद्वारे तो रसिकांसमोर येतो आहे. अभिजीत खांडकेकर, विनित शर्मा, संस्कृती बालगुडे, स्मिता गोंडकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मानसिक आजारावर बोलतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मानवी मनावर कळत नकळत कसा परिणाम होतो हे दाखवण्याचा या दिग्दर्शकाचा हा प्रयत्न आहे. प्रयत्न म्हणून त्याची दखल घ्यायला हवी. पण चित्रपट म्हणून यात अनेक गोष्टींची कमतरता जाणवते. विषय चांगला असला, तरी तो मांडताना त्याचा पसारा नेटका न झाल्यामुळे हा चित्रपट केवळ सरधोपट गोष्टींवर बोलतो आणि पुढे जातो. चित्रपट वेगवान झाला असला, तरी तो भिडत नाही.


चित्रपटाच्या नायकाला वेगवेगळी स्वप्नं पडतात. कुणीतरी त्याला ढकलतं.. तो ट्रेनखाली आला आहे, कोणीतरी त्याचा गळा आवळतं आहे. कुठेतरी फायरिंग झालं आहे अशा पद्धतीची ही सगळी स्वप्नं. त्यामुळे तो आधीच असुरक्षित बनला आहे. त्याची पत्नी त्याच्यावर कमालीची प्रेम करते. नायकाच्या अनपेक्षित वर्तनाचा तिलाही त्रास होतोय. पण तो असं का वागतो त्याचं कारण तिला कळत नाही. सततच्या स्वप्नांनी तो भयभीत झाला आहे. त्या भीतीपोटीचं त्याच्या व्यक्तिमत्वात बदल घडू लागला आहे. हे भय त्याला कोणत्या थराला नेतं त्याची ही गोष्ट आहे.

नायकाच्या भूमिकेत अभिजीत खांडकेकर असून, त्याच्या पत्नीच्या भूमिकेत स्मिता गोंडकर आहे. या चित्रपटाच्या गाण्याचं चित्रिकरण दुबईत झाल्यामुळे सिनेमाला एक वेगळा लूक मिळतो. अभिजीत खांडकेकरने भयग्रस्त झालेला नायक नेटका रंगवला असला, तरी चित्रपटाच्या लेखनात आणखी सुधारणा आवश्यक होत्या असं वाटतं. लेखनातल्या त्रुटीमुळे हा चित्रपट थेट भिडत नाही. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, संस्कृती  बालगुडे यांच्याही भूमिका आहेत. पण त्याच्या भूमिकेला मर्यादा असल्याचं जाणवतं.

भय बनवण्यामागची भूमिका प्रामाणिक असली तरी चित्रपटासाठी आवश्यक असलेली पटकथा, संवाद यांचा अभाव चित्रपटात दिसतो. नायकाला मानसिक आजार आहे हे कळल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा पत्नीचा अॅप्रोच बदललेला दिसत नाही, त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. या चित्रपटात आलेला इन्स्पेक्टरचा ट्रॅकही बराच लांबल्याने मूळ गोष्टीपासून हा  चित्रपट फारकत घेतो. याची गाणी चाल म्हणून ठीक असली तरी त्या गीतांचं उच्चारण बेफिकिरीने झाल्याचं जाणवतं. अमराठी गायकाने हे गायन केल्याचा फटका गाण्यांना बसला आहे. असो.

पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतो ओकेओके स्मायली.