मुंबई : 'मसान'गर्ल अर्थात अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फझल यांच्या प्रेमप्रकरणाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. जवळपास वर्षभरापासून दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती आहे. मात्र लग्नाबाबत अजिबात घाई करणार नसल्याचं रिचा चढ्ढाने सांगितलं आहे.


रिचा आणि अली या क्यूट जोडप्याची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळे दोघं विवाहबंधनात कधी अडकणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 'लग्न हा सध्या आमचा अजेंडा नाही. आम्ही आयुष्याचा आनंद घेत आहोत. रिलेशनशीप हळूहळू पुढे नेण्यावर आमचा भर आहे' असं रिचा सांगते.

'अलीला हॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला आहे, तर आमचा 'फुक्रे 2' बॉलिवूडमध्ये मोठा हिट ठरला. सध्या तरी आम्ही कामावरच लक्ष केंद्रित करत आहोत. आमच्या तारखा वर्षभरासाठी बूक झाल्या आहेत. त्यामुळे या वर्षात तरी लग्नाची शक्यता नाही' असं रिचाने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

'ओये लकी लकी ओये' चित्रपटातून 2008 मध्ये रिचाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'गँग्ज ऑफ वासेपूर'चे दोन भाग, 'फुक्रे'चे दोन भाग, गोलियोंकी रासलीला - रामलीला, मै और चार्ल्स, चॉक अँड डस्टर, सरबजीत यासारख्या चित्रपटात ती झळकली.

मसान (2015) चित्रपटात रिचाने केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. येत्या वर्षात तिचे 'थ्री स्टोरीज', दास देव, लव्ह सोनिया, कॅब्रे, घुमकेतू हे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

अभिनेता अली फझल फुक्रे (2013) मध्ये रिचासोबत प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यानंतर बॉबी जासूस, सोनाली केबल, खामोशिया, फुक्रे रिटर्न्समध्ये तो झळकला. अलीने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. फुक्रे रिटर्न्सच्या शूटिंगवेळी दोघं रिलेशनशीपमध्ये अडकल्याचं म्हटलं जातं.