चेन्नई : स्टेट बँकेकडून वाहन कर्ज घेऊन चक्क चित्रपटाची निर्मिती केल्याचा प्रकार तामिळनाडूमध्ये उघडकीस आला आहे. एसबीआयने मद्रास हायकोर्टात अंतरिम याचिका दाखल केल्यानंतर संबंधित तामिळ सिनेमाचं प्रदर्शन कोर्टाने रोखलं आहे.


'अरुवा संदा' हा चित्रपट 16 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. कबड्डीपटू राजा आणि मालविका मेनन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. मात्र वाहनकर्ज काढून या सिनेमाची निर्मिती केल्याचं उघड झालं. त्यानंतर जस्टीस सीव्ही कार्तिकेयन यांनी व्हाईट स्क्रीन प्रॉडक्शन्सला हा सिनेमा प्रदर्शित करण्यास मज्जाव केला.

मुख्य भूमिकेत असलेल्या कबड्डीपटूसह 13 जणांनी विविध प्रकारच्या गाड्यांसाठी 3 कोटी 30 लाख रुपयांचं कर्ज काढलं. डी चित्रा नामक ऑटो लोन काऊन्सिलरच्या माध्यमातून कर्जदारांनी केव्हायसी फॉर्मही दाखल केला होता.

चित्राने बनावट कागदपत्रं सादर केल्याचं बँकेने सांगितलं. त्याचप्रमाणे बँकेच्या संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम अॅक्सेस करुन बँक अधिकाऱ्यांच्या नकळत कर्ज मंजूर केल्याचा दावाही स्टेट बँक ऑफ इंडियाने केला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेलाचेरी शाखेच्या व्यवस्थापकाला अनियमितता आढळली. चौकशीमध्ये कर्जाची रक्कम सिनेमाच्या निर्मितीसाठी वापरल्याचं उघड झालं.

बँकेच्या याचिकेनंतर मद्रास हायकोर्टाने सिनेमातील कलाकार आणि निर्मात्यांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर बँकेने पुन्हा कोर्टात धाव घेऊन सिनेमाच्या रीलीजला आडकाठी केली.