शाद अलीच्या सिनेमातून नेहमीच एंटरटेनिंग व्हॅल्यूज मिळत असतात. अगदी साथीया, बंटी और बबली, झूम बराबर झूम, किल दिल, ओके जानू हे त्याचे सिनेमे. आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी की दिग्दर्शक होण्याआधी त्याने दिग्दर्शनासाठी सहाय्य केलं होतं ते मणिरत्नम यांना. म्हणून शाद अलीच्या सिनेमात मणिरत्नमची ठेवण नसली तरी त्यांची झाक दिसते.
आजवर छोट्या छोट्या गोष्टी घेऊन त्याने त्या पडद्यावर मांडल्या. आता आपला नवा सिनेमा करताना मात्र त्याने एक जगणं पडद्यावर मांडायचं ठरवलं. संदीप सिंग. भारतीय हॉकीचा कर्णधार. याचं जगणं मांडताना त्याचा खेळ दाखवायचा की त्याचं जगणं दाखवायचं याच्यात गोंधळ असू शकतो, पण खेळ आणि जगणं एकमेकांमध्ये बेमालूम मिसळून त्यांने ते मांडलं आहे. म्हणून हा सिनेमा तुम्हाला स्फूर्ती देतो.
संदीप सिंग एका अत्यंत बेताच्या परिस्थितीत राहणारा. घरी हॉकीचे संस्कार झालेले. मोठा भाऊ भारतीय संघात निवड होता होता राहिलेला. संदीपला मात्र खेळापेक्षा शेती करण्यात रस. पण त्याची प्रेयसी भारतीय टीमकडून खेळणारी. तिच्या प्रेमापोटी संदीप हॉकीकडे वळतो. विक्रमी वेळेत हॉकीत प्रवीण होतो. भारतीय टीममध्ये निवड झाल्यानंतर एका क्षणी संदीपचं आयुष्य पूर्ण बदलतं. होत्याचं नव्हतं व्हायची वेळ येते आणि बघता बघता संदीप जायबंदी होतो. त्यानंतर पुढे ही गोष्ट कशी पुढे जाते. संदीप सिंग पुढे पुन्हा एकदा हॉकी खेळला हा इतिहास आहे. पण तो स्ट्रगल पाहणं रोमांचित करणारं आहे.
यात कमाल दाखवली आहे ती दिलजित दोसांझने. मुळात गायक असलेला हा कलाकार, पण त्याने संदीपच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. डोळ्यातला इनोसन्स सतत दाखवतानाच, खेळाडू म्हणून असलेली जिगरही त्याने दाखवली आहे. त्याला उत्तम साथ दिली आहे ती तापसी पन्नू, सतिश कौशिक, दानिश हुसेन, कुलभूषण खरबंदा आदी कलाकारांनी. यातली गाणी, पार्श्वसंगीत आदी सगळ्याच बाबी उत्तम आहेत.
मुद्दा इतकाच आहे, की जगण्याची प्रखर गोष्ट सांगताना हा सिनेमा कुठे भिडत नाही. तो नेटका असा घडत जातो आणि सिनेमापेक्षा संदीपचं जगणं कमालीचं मोठं असल्याचं पदोपदी पटत जातं. हा सिनेमाही त्याच्या जगण्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असायला हवा होता असं वाटून जातं. तरी सूरमा आपल्याला स्फूर्ती देतो हे नक्की. दिलजितचा अभिनय, शाद अलीचे कष्ट आणि सगळ्यात महत्वाचं संदीप सिंगचा जिगरा अनुभवण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. म्हणून पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतोय रेड हार्ट.
रिव्ह्यू: जिद्दीचा 'खेळा'त्मक प्रवास: सूरमा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 11:59 AM (IST)
सिनेमापेक्षा संदीपचं जगणं कमालीचं मोठं असल्याचं पदोपदी पटत जातं. हा सिनेमाही त्याच्या जगण्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असायला हवा होता असं वाटून जातं. तरी सूरमा आपल्याला स्फूर्ती देतो हे नक्की.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -