सिनेमाचं शीर्षक कमालीचं आकर्षक आहे. म्हणजे, हे दोन शब्द कुणालाही अनोळखी नाहीत. उलट घेतली तर याची धास्तीच जास्त घेतली जाते. पांडुरंग जाधव यांनी हा नवा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. विशेष बाब अशी की वामन केंद्रे यांचा मुलगा ह्रत्विक केंद्रे याचा हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे त्याचं हे पदार्पण कसं होतं ते पाहाणं ओत्सुक्याचं होतं. या सिनेमाची उत्सुकता आहे ती त्यासाठी. शिवाय यातलं दारू डिंग डांग हे गाणंही सध्या यादीत टाॅपवर आहे. एकूणात हा सिनेमा कशावर बोलतो, काय सांगतो याकडे लक्ष होतंच. पण नवे कलाकार, दिग्दर्शकाची सुटलेली पकड यामुळे हा सिनेमा पुरता मुरलेला वाटत नाही. तो नवखा वाटत राहतो.
पण इथे थोडी गल्लत झाली आहे. म्हणजे सिनेमा बनवण्यामागे नेमका प्लाॅट नसल्याने, कथाबीजामध्येच फारसा दम नसल्यामुळे हा सगळा डोंगर पोकळ ठरला आहे. ही गोष्ट तीन मित्रांची आहे. त्यातल्या एकाचं ब्रेक अप होतं. तिघेही दारू प्यायची ठरवतात. पण त्या दिवशी असतो ड्राय डे. मग कशीबशी ते दारू मिळवतात त्यातून सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. यात आणखी एक पदर आहेच. म्हणजे आजपासून सिनेमा सुरू होतो तेव्हा, त्यातला एक मित्र आपल्या मित्रांची गोष्ट काॅलेजमधल्या मुलांना सांगतोय. असं एकात एक करत हा सिनेमा मागे मागे जातो.
खरंतर ब्रेकअप झाल्यानंतर पुढं काय, असा सिनेमा हवा. पण ठिके,. मागे जाताना त्यातून काहीतरी भरीव निष्पन्न होणं अपेक्षित आहे, पण अशक्त कथाबीज, ढोबळ पटकथा, पोकळ संवाद आणि त्यावर कलाकारांच्या नवखेपणाने या सिनेमाचा डोलारा पुरता कोसळला आहे. तीन मित्रांची भूमिका निभावली आहे ह्रत्विक, कैलास वाघमारे आणि योगेश सोनी यांनी. या तिघांनीही प्रामाणिक काम केलं असलं तरी ते तोकडं पडतं. सिनेमावर हवी असणारी दिग्दर्शकीय पकड इथे कुठेच दिसत नाही. मुख्य नायिकेची भूमिक साकारली आहे मोनालीसा बागल यांनी. भूमिकेची खोली आणि समज लक्षात न आल्याचा मोठा तोटा त्यांच्या भूमिकेला झाला आहे. सतत मोनोटोनस दिसणं आणि बोलणं यामुळे सिनेमाला पुरता फटका बसला आहे.
सिनेमाची भाषा कोल्हापुरी असल्यामुळे ती एेकायला गोड वाटते. पण अधेमधे मात्र त्यावरची पकड सुटल्याचं जाणवतं. एक नक्की यातली गाणी श्रवणीय आहेत. दारू डिंग डांग तर पाहायलाही छान वाटतं. गाण्यांवर घेतलेली मेहनत, त्यातली उर्जा सिनेमात असायला हवी होती असं वाटून जातं. एका चांगल्या सिनेमासाठी आवश्यक बाबी पुरेशा नसल्यामुळे हा चित्रपट अॅव्हरेज ठरला आहे. यापुळे मात्र काम करताना दिग्दर्शकासह त्याच्या टीमला काळजी ध्यावी लागणार आहे. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळाला आहे, ओके-ओके इमोजी. इटस अ अॅव्हरेज मुव्ही. तरीही सिनेमा पाहायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन पाहा.