Sonu Nigam : लोकप्रिय गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) वडिलांच्या  ओशिवरा येथील घरी चोरी झाली आहे. बेडरूमच्या डिजिटल लॉकरमधून सुमारे 72 लाख रुपये चोरीला गेले आहेत. चोरी झाल्यानंतर सोनू निगमची बहिण निकीताने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 


सोनू निगमच्या वडिलांच्या घरी कोणी चोरी केली? 


सोनू निगमच्या वडिलांच्या ओशिवरा येथील घराच्या बेडरुममधील लॉकरमधून 72 लाख रुपये चोरीला गेले आहेत. चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने बेडरुममधील लॉकर उघडून त्यातील रोख रक्कम चोरली असल्याचा संशय आहे. चोरी झाल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता ड्रायव्हर म्हणून काम करणारा रेहान नामक व्यक्ती फ्लॅटकडे बॅग घेऊन जाताना दिसत आहे.






रेहान विरोधात गुन्हा दाखल; सोनू निगमच्या वडिलांची माहिती


सोनू निगमच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रेहान हा सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण आठ महिन्यांपूर्वी त्याला कामावरुन काढण्यात आले होते. आता सोनू निगमच्या वडिलांचा त्याच्यावर संशय असून ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात रेहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आपल्या गायनाने सर्वांना वेड लावणाऱ्या सोनू निगमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गायनासह आपल्या हटके अंदादासाठी सोनू ओळखला जातो. तसेच अनेकदा तो त्याच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असतो. पण सध्या तो वडील आणि गायक अगमकुमार निगम यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांच्या घरातून लाखो रुपयांची चोरी झाली आहे. आता याप्रकरणी सोनूच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाख केली आहे. 


तक्रारीमध्ये सांगितल्यानुसार, रेहान नामक ड्रायव्हर सोनू निगमच्या वडिलांच्या घरी 8 महिने ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. पण त्याचं काम व्यवस्थित नसल्यानं त्याला काही दिवसांआधीच कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.


संबंधित बातम्या


Sonu Nigam : सोनू निगमला धक्काबुक्की करणारा आमदारांचा मुलगा मुंबईबाहेर; पोलीस लवकरच करणार चौकशी