Zwigato Movie Review :  भारतात मागील काही वर्षात सर्व्हिस सेक्टरची मोठी वाढ झाली आहे. या सेक्टरची वाढ होत असताना स्टार्टअपचीदेखील सुरुवात होत आहे. सध्या फूड, ई-कॉमर्स डिलीव्हरी सेक्टरमध्ये मोठी वाढ होत आहे. या डिलिव्हरी बॉयच्या प्रश्नांना मांडण्याचे काम झ्विगॅटोमधून केले आहे. छोट्या पडद्यावरील कॉमेडी किंग असलेला कपिल शर्माची मुख्य भूमिका आणि धीर गंभीर भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नंदिता दासचे दिग्दर्शन असल्याने या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. हा चित्रपट बऱ्याच अंशी अपेक्षा पूर्ण करतो.


हा चित्रपट लॉकडाउनमध्ये एका कंपनीतील मॅनेजरची नोकरी गमावल्यानंतर घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी फूड डिलिव्हरीचे काम स्वीकारणाऱ्या मानस सिंहची ही गोष्ट आहे. मानसचे कुटुंब हे सर्वसाधारण भारतीय कुटुंब आहे. निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात मानसची आजाराने अंथरुणाला खिळलेली आई, कोणत्याही परिस्थितीत खंबीर साथ देणारी पत्नी आहे. सोशल मीडियामुळे रॅपची आवड निर्माण झालेला मुलगा आहे आणि हुशार, जबाबदारीचे भान असलेली मुलगी आहे. फूड डिलिव्हरीचे काम करताना Intensive मिळवण्यासाठी मानसला 5 स्टार रेटिंग मिळवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. दिवसाला किमान 10 ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याची सुरू असलेली तारेची कसरत, ग्राहकांकडून दिले जाणारे निगेटिव्ह रिव्ह्यू आणि कंपनीकडून होणारी कारवाई याभोवती चित्रपटाची कथा आहे. 


या चित्रपटातील काही प्रसंग, फ्रेम खूप काही सांगून जातात. बेरोजगारांची निर्माण झालेली टोळी, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, सूचक पद्धतीने मांडण्यात आले आहे.  चित्रपटाच्या सुरुवातीला मानसला पडलेल्या स्वप्नाचा उलगडा क्लायमॅक्सच्या वेळी होतो. खरंतर हे स्वप्न या देशातील प्रत्येक मानसचे आहे. ज्याच्या मागे लाखोजण आहेत.  'झ्विगॅटो' या सिनेमात कपिल शर्माने चांगला प्रयत्न केला आहे. आयुष्यात दररोज येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या मानसला न्याय देण्याचा प्रयत्न कपिलने केला आहे. छोट्या पडद्यावर त्याच्या शोमुळे निर्माण झालेली इमेज त्याला तोडणे मात्र शक्य झाल्याचे दिसत नाही. शाहाना गोस्वामीने प्रतीमाची व्यक्तीरेखा ताकदीने साकारली आहे. 


'झ्विगॅटो' या चित्रपटासाठी नंदिता दासचे एका गोष्टीसाठी कौतुक आणि अभिनंदन करावे लागेल. बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील मुख्य प्रवाहातील चित्रपटात श्रमिक वर्गाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. Working Class चे प्रश्न, त्यांचे संघर्ष रुपेरी पडद्यावरून काहीसे दूर गेले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ही उणीव काही प्रमाणात भरुन निघाली. मागील काही काळात बदललेली आर्थिक परिस्थिती, भांडवली व्यवस्थेत झालेले बदल, कारखान्यात उत्पादन करत असलेल्या संघटित कामगारांच्या तुलनेत असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या वाढत आहे. त्यांचे प्रश्न, शोषणाचे स्वरुप संघटित क्षेत्रातील कामगारांपेक्षा भिन्न आहेत. याच मुद्यावर हा चित्रपट काही प्रमाणात भाष्य करतो. स्टार्टअप, खासगी क्षेत्रामुळे रोजगाराचे प्रमाण कसे वाढले, यावर भाष्य होते, त्याच वेळी त्यात होणाऱ्या शोषणावर बोट ठेवले जाते. 


सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना मग हे भाष्य चित्रपट असो किंवा कलेच्या माध्यमातून असो किंवा इतर माध्यमातून असो..संबंधितांनी थेट भूमिका घेणे आवश्यक असते. मात्र, नंदिता दासने ही भूमिका घेतली नसल्याचे दिसते. नव्याने उदयास आलेल्या कामगार वर्गाचे प्रश्न मांडले असले तरी चित्रपटाचा शेवट होताना त्याला भूतदयेची किनार दिसते. नव्या व्यवस्थेत ज्याचे शोषण होत आहे, तो नायक आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी नव्याने धाव घेतो. पण, तो व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही, त्याला शरण जात पुन्हा त्याच्याशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात दिसतो. या चित्रपटात मागील काही वर्षांपासून समाजात झालेले बदल मात्र दिसून आले आहे. उदाहरण म्हणजे मुस्लिम नाव असलेला डिलिव्हरी बॉय मंदिरात फूड डिलिव्हरी करण्यास नकार देतो आणि मानसला ते पॅकेट देण्याची विनंती करतो. त्यातील त्याची दिसणारी हतबलता खूप काही सांगून जाणारी आहे. तर, दुसरीकडे जातीयवादाची झळ आजही समाजातील वंचित घटकाला बसत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. मानसची पत्नी प्रतीमा मॉलमधील सफाई कामाकरीता एका जॉब प्लेसमेंट-कंत्राटदाराच्या ऑफिसमध्ये असताना रांगेतील दोघांना नोकरी देणे शक्य नसल्याचे तो अधिकारी सांगतो. शेवटी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणारा त्यांच्या पाया पडतो, झगडतो आणि तिथून बाहेर पडताना बाबासाहेब, अजून काहीच बदलले नाही असे उद्गिवनपणे म्हणतो. चित्रपटातील फ्रेम खूप बोलक्या आहेत. कामगार नेता बेरोजगारीवर भाष्य करत असताना अचानकपणे साउंड सिस्टिम बंद केली जाते आणि सभेच्या विरोधात असणारे घटक मोठ्या आवाजात गाणी लावतात. आजच्या परिस्थितीत हे दृष्य फार बोलके आहे. 


नंदिता दासने याआधी 'मंटो' सारख्या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवले होते. त्यामुळे तिच्याकडून या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या अपेक्षा होत्या. काही अंशी या पूर्णदेखील होतात.  मात्र, दिग्दर्शिकेला या चित्रपटातून बऱ्याच गोष्टी मांडता आल्या असत्या. बरं चित्रपटही आटोपशीर आहे. त्यामुळे किंचीत लांबला असता तरी विशेष फरक पडला नसता. समाजातील श्रमिक वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा भूतदयावादी नसावा तर त्याचे अधिकार, समानता या मुद्यावर असावा हे अधोरेखित करता आले असते. ही संधी नंदिताने गमावली असं म्हणावं लागेल.