Sonali Phogat : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. मात्र याच दरम्यान आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला खळबळजनक माहिती दिली आहे. सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला. यासाठी त्याने तांत्रिकाला अनेकवेळा फार्म हाऊसवर बोलावले होते, असा दावा ऋषभ बेनिवालने केला आहे.
याप्रकरणी सोनाली फोगटचे पीए सुधीर सांगवान याच्यासह पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. सुधीर सांगवान व्यतिरिक्त कथित ड्रग्ज तस्कर आणि गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.
ऋषभ बेनिवाल यांनी सुधीर सांगवान याच्यावर आणखी आरोप केले आहेत. ऋषभ यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, "सोनालीची मुलगी यशोधरा हिलाही सुधीरकडून धोका आहे, माझ्या उपस्थितीत त्याने सोनालीशी गैरवर्तन केले. त्याच्याकडे असे काहीतरी होते ज्याने सोनाली तो काय म्हणतोय ते ऐकत असे. मी सोनालीला त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डबद्दल सांगितले होते. रोहतकमध्ये सुधीर सांगवानची फौजदारी फाइल आहे. अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली सुधीरने शेतकऱ्यांची करोडो रुपयांची फसवणूक केली.
सुधीर सांगवानच्या कथित फसवणुकीचा बळी झालेला शेतकरी अमित डांगी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "सुधीर सांगवान सोनाली फोगटसह शेतकऱ्यांकडे यायचा. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसोबत सोनाली फोगटचा व्हिडीओही उपलब्ध आहे.
टिकटॉक स्टार राहिलेल्या सोनाली यांना भाजपकडून हिसारमधून उमेदवारी देण्यात आली होती. रियॅलिटी शो 'बिग बॉस'मुळेही (Big Boss) सोनाली फोगाट चर्चेत आल्या होत्या. उत्तर गोव्यातील अंजुना येथील रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकानं त्यांना 23 ऑगस्ट रोजी मृत घोषित केलं होतं. परंतु, त्यांच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे. सोनाली यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे करण्यात येत असून तिची हत्या केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आतपर्यंत चार जणांना अटक केली असून पुढील तपास देखील वेगाने सुरू आहे. या प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
सोनाली यांच्या शवविच्छेदनातच्या अहवालामध्ये आता असं म्हटलं गेलं आहे की, त्यांना जबरदस्तीनं ड्रग्स देण्यात आलं होतं. सुधीर याने आपण सोनालीला जबरदस्ती ड्रग्ज दिलं होतं याची कबुली देखील पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे ही हत्या का करण्यात आली आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.