मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने प्रख्यात संगीतकार-गायक अनू मलिक यांना लैंगिक शोषणकर्ता म्हटल्यानंतर गायिका श्वेता पंडितनेही त्यांच्यावर आरोप केला आहे. शान, सुनिधी चौहान यासारख्या प्रसिद्ध गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने 2001 साली आपल्याकडे किस मागितल्याचा दावा श्वेताने ट्विटरवरुन केला आहे.


होतकरु गायिकांना अनू मलिकपासून सावध राहण्याचा इशाराही श्वेता पंडितने दिला. ज्या तरुणी आतापर्यंत अनू मलिक यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवण्याचं आवाहनही तिने ट्विटरवरुन केलं.

सोना मोहापात्राने कैलाश खेर आणि अनू मलिक हे 'सिरीअल सेक्शुअल प्रीडेटर' म्हणजेच वारंवार महिलांचं लैंगिक शोषण करणारे असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र आपण सोनासोबत कधी काम केलं नाही, इतकंच काय तिला भेटलोही नाही, असा दावा अनू मलिकने केला.

'ती जुनी जखम उघडी करुन पेडोफाईल (लहान मुलांचं शोषण करणारे) आणि लैंगिक शोषणकर्त्यांविरोधात बोलणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मोहब्बते चित्रपटात मला 2000 साली गाण्याची संधी मिळाली. मी तेव्हा किशोरवयीन असल्याने माझं कौतुक व्हायचं. मला आणखी गाणी गायची होती. 2001 मध्ये मला अनू मलिक यांचे मॅनेजर मुस्तफा यांचा फोन आला आणि त्यांनी मला एम्पायर स्टुडिओमध्ये बोलावलं. मी खूपच उत्सुक होते.' असं श्वेताने लिहिलं आहे.

'अनू मलिक यांनी मला म्युझिकशिवाय गाण्यास सांगितलं. मी हर दिल जो प्यार करेगा हे गाणं गायले. ते खूप खुश झाले. ते म्हणाले, मी तुला शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन, पण आधी मला एक किस दे. मी घाबरले. मी तेव्हा शाळेत होते. जेमतेम 15 वर्षांची. कोणीतरी माझ्या पोटात सुरा खुपसल्यासारखं मला वाटलं. ते माझ्या कुटुंबाला ओळखायचे आणि मी त्यांना अनू अंकल म्हणायचे. त्यांना दोन मुली असताना ते एका अल्पवयीन मुलीशी असं वागले?' असा प्रश्न श्वेता विचारते.

'मी निराश झाले. माझ्या मनावर आघात झाला. मी फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते. पण एका शोषणकर्त्यासाठी मी माझी पॅशन का सोडावी, असा विचार करुन मी लढत राहिले' असं श्वेताने सांगितलं.


#MeToo चं वादळ

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, संध्या मृदुल, सिमरन कौर सुरी, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यासारख्या अनेक महिला कलाकारांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, साजिद खान, गायक कैलाश खेर, शोमॅन सुभाष घई, दिग्दर्शक विकास बहल, अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणजेच अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतीन दास, अभिनेते रजत कपूर, अभिनेते पियुष मिश्रा, लेखक चेतन भगत, निर्माता गौरांग दोषी, पार्श्वगायक अभिजीत, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ, कॉमेडिअन गुरसिमरन खंबा, कानन गिल, उत्सव चक्रवर्ती, यशराज फिल्म्सचा क्रिएटिव्ह हेड आशिष पाटील अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.

अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. तर अभिनेता साकिब सालेमने आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाची आठवण सांगितली.  शक्ती कपूर, राहुल रॉय , सैफ अली खान यांनीही मीटू चळवळीवर मत व्यक्त केलं.

बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (सिन्टा) लवकरच लैंगिक शोषणविरोधी समितीची स्थापना करणार असून त्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांनी राजीनामा दिला. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.