मु्ंबई : बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (सिन्टा)ने कंबर कसली आहे. 'सिन्टा' लवकरच लैंगिक शोषणविरोधी समितीची स्थापना करणार असून त्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.


रवीना टंडनने स्वतः या समितीवर येऊन पीडितांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सिंटाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुशांत सिंहने ही माहिती दिली. या समितीत रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांच्याशिवाय दिग्दर्शक अमोल गुप्ते आणि पत्रकार भारती दुबे यांचाही समावेश असेल. त्याचप्रमाणे लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक समितीच्या वकील आणि मानसोपचारतज्ज्ञांचीही निवड करण्यात येईल.

लैंगिक शोषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपसमितीची स्थापून कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. एखादा कलाकार गुन्हेगार सिद्ध झाल्यास बॉलिवूडमधील कुठल्याच व्यक्तीने त्याच्यासोबत काम करु नये, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सुशांतने सांगितलं.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचं प्रकरण कोर्टात असून नाना पाटेकर यांनी 'सिंटा'ला उत्तरही दिल्याचं सुशांतने सांगितलं. आलोकनाथ यांनी कारणा दाखवा नोटीसला उत्तर देताना आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

लैंगिक शोषणाप्रमाणेच चित्रपट आणि टीव्ही विश्वातील कामाचे तास, सेटवरील अमानवी वागणूक, कमी मानधन यासारख्या प्रकरणांवरही निर्मात्यांनी लक्ष द्यायला हवं, अशी अपेक्षा 'सिंटा'ने व्यक्त केली.

#MeToo चं वादळ

अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, संध्या मृदुल, सिमरन कौर सुरी, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यासारख्या अनेक महिला कलाकारांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, साजिद खान, गायक कैलाश खेर, शोमॅन सुभाष घई, दिग्दर्शक विकास बहल, अभिनेता विकी कौशलचे वडील म्हणजेच अॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतीन दास, अभिनेते रजत कपूर, अभिनेते पियुष मिश्रा, लेखक चेतन भगत, निर्माता गौरांग दोषी, पार्श्वगायक अभिजीत, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ, कॉमेडिअन गुरसिमरन खंबा, कानन गिल, उत्सव चक्रवर्ती, यशराज फिल्म्सचा क्रिएटिव्ह हेड आशिष पाटील अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत.

अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. तर अभिनेता साकिब सालेमने आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाची आठवण सांगितली.  शक्ती कपूर, राहुल रॉय , सैफ अली खान यांनीही मीटू चळवळीवर मत व्यक्त केलं.

#MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांनी राजीनामा दिला. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला.