Sidhu Moose Wala : लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धू मुसेवाला आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. जुपिंदरजीत सिंह यांच्या 'हू किल्ड मूसेवाला' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा असणार आहे. 


लोकप्रिय सिनेनिर्माते श्रीराम राघवन यांच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत 'अंधाधुन', 'मोनिका ओह माय डार्लिंग' आणि 'स्कूप' सारख्या कलाकृतींची निर्मिती करण्यात आली आहे. आता मॅचबॉक्स शॉट्सने 'हू किल्ड मूसेवाला' या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आहेत. सिद्धू मूसेवालाचं आयुष्य, हत्या या सर्व गोष्टींवर आधारित हे पुस्तक आहे. 


जुपिंदरजीत सिंह म्हणाले की,"सिद्धू मूसेवालाच्या हत्येवर मी पुस्तक लिहिल्यानंतर अनेक निर्मितीसंस्थांनी माझ्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आजवर मॅचबॉक्स शॉट्सने अनेक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली आहे. त्यांच्या कामाने मी प्रभावित झालो असून त्यांनी या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आहेत. या पुस्तकाचे हक्क विकत घेतल्यानंतर आता नव्या रुपात त्यांना ही गोष्ट लोकांसमोर आणायची आहे". 


मॅचबॉक्स शॉट्स प्रोडक्शनच्या सरिता पाटील म्हणाल्या की,"पंजाबमधील म्यूजिक सीन आणि तेथीट घटना, गोष्टी या नेहमीच मला विचार करायला भाग पाडतात. आता जुपिंदरजीत यांच्या 'ह किल्ड मूसेवाला' या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं कथानक मिळालं आहे". 


सिद्धू मूसेवाला यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमात प्रेक्षकांना हत्या आणि थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. तसेच या सिनेमातील गाणी हा या सिनेमाचा क्रेंद्रबिंदू आहे. जुपिंदरजीत सिंह यांनी लिहिलेल्या पुस्तकात पंजबामध्ये ड्रग्ज आणि हिंसाचाराला बळी पडत असलेल्यांची गोष्ट योग्य पद्धतीने मांडण्यात आली आहे.  या सिनेमात काही रहस्यमय दृष्ये वेगळ्यापद्धतीने उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


शुभदीप सिंह सिद्धू आता एका नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याने या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिद्धू मुसेवाला यांनी 'झी वेगन'मधून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सिद्धू मुसेवाला यांना त्यांच्या गाण्यांमुळे खूप नाव आणि प्रेम मिळाले आहे. 2020 मध्ये, त्यांना गार्डियनच्या टॉप 50 नवीन कलाकारांमध्ये नामांकन मिळाले होते. सिद्धू मुसेवाला यांनी ‘निंजा परवाना’ हे गाणे लिहून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, ते या गाण्यामुळे अनेक वादात अडकले होते.


संबंधित बातम्या


Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी; मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक