Siddharth Jadhav : मराठी मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मराठीसह हिंदी सिनेमांत तो आपल्या अभिनयाची छाप पाडतो. पण वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या निर्णयांमुळेही तो प्रेक्षकांची मने जिंकतो. 'आपला सिद्धू' (Aapla Siddhu) व्यसनापासून दूर आहे. आईला दिलेल्या शब्दाखातर त्याने कधीही दारू-सिगारेट या गोष्टींना हात लावलेला नाही. तसेच जुगारासंबंधित जाहिराती त्याने कधी केलेल्या नाही आणि यापुढेही अशापद्धतीच्या जाहिराती न करण्याचा निर्णय सिद्धार्थने घेतला आहे.


सिद्धार्थ जाधवचा 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' (The Defective Detectives) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थचा हा आगामी इंग्लिश चित्रपट आहे. 'अफलातून' या मराठी सिनेमाचा हा इंग्लिश रिमेक असणार आहे. सिद्धार्थने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हेल्थ हा फॅक्टर त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. शूटिंगदरम्यान त्याने तब्येतीकडे खूप लक्ष दिलं आहे. डाएट न करता व्यायाम करण्यावर त्याने भर दिला. 


सिद्धार्थ जाधव व्यसनापासून दूर (Siddharth Jadhav Never Drink Alcohol)


एबीपी माझाशी बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला,"दारू, सिगारेट या गोष्टींचं मला कधीही आकर्षण वाटलं नाही. माझ्यासाठी माझे आई-बाबा खूप महत्त्वाचे आहेत. मी कधीही व्यसन करणार नाही, असं मी माझ्या आईला वचन दिलं होतं. त्यावेळी आईदेखील तुला कधी या गोष्टींचं आकर्षण वाटलं तर आमचा चेहरा डोळ्यासमोर आण असं म्हणाली होती. आईसोबत एक भावनिक कनेक्ट आहे. त्यामुळे तिला दिलेल्या शब्दाखातर मी व्यसनापासून दूर आहे".


सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. याअंतर्गत व्यसनमुक्तीसंबंधित अनेक कामे त्याने केली आहे. विविध कॉलेजमध्ये जात तरुणांमध्ये जनजागृती करण्याचं काम त्याने केलं आहे. त्याच्यासाठी ही बाब खूप अभिमानास्पद होती. 


मेहनतीच्या जोरावर गाठला यशाचा टप्पा


सिद्धार्थ जाधव मराठी मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीतही आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांसोबत त्याने काम केलं आहे. आता इंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. रंग, रुप या गोष्टींकडे दुर्लक्ष करत केवळ अभिनयाच्या जोरावर त्याने यशाचा टप्पा गाठला आहे. सिद्धार्थच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. सिद्धार्थचा 'लग्न कल्लोळ' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली.


संबंधित बातम्या


Siddharth Jadhav : "जुगाराची जाहिरात मी कधीच करणार नाही"; सिद्धार्थ जाधवने स्पष्टच सांगितलं, मराठी, हिंदीनंतर 'आपला सिद्धू' झळकणार 'या' इंग्रजी चित्रपटात