Shivrayancha Chhava : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणारे, विविध धाटणीचे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रदर्शित होत आहेत. यात ऐतिहासिक सिनेमांची अधिक भर आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक सिनेमे बनवत आहेत. त्यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
सूर्यासम तेजस्वी अजेय योद्धा.. 'शिवरायांचा छावा' अवतरणार
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे 'शिवरायांचा छावा' साकारणार कोण..? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
दिग्पाल लांजेकरांनी शेअर केलं 'शिवरायांचा छावा'चं पोस्टर आऊट!
अभिनेते, लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शिवरायांचा छावा' या सिनेमाचं पोस्टर आऊट केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात". पोस्टर आऊट झाल्याने 'शिवरायांचा छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांनी उत्सुकता लागली आहे. दिग्पालच्या पोस्टवर आतुरता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमाची, छत्रपती संभाजी महाराज की जय, आतुरता 16 फेब्रुवारीची, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'शिवरायांचा छावा' कधी प्रदर्शित होणार? (Shivrayancha Chhava Release Date)
'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.