Jacqueline Fernandez Moves Delhi HC : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेत आहे. जॅकलीनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 200 कोटींच्या प्रकरणात आता जॅकलीनला दिलासा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


जॅकलीन फर्नांडिसची ED विरोधात याचिका


जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) ईडीविरोधात याचिका दाखल केली आहे. 200 कोटींचं प्रकरण रद्द करण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने जॅकलीन विरोधात 200 कोटी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता तिने हे सर्व गुन्हे आणि इतर चार्जशीट रद्द करण्याचं आव्हान दिल्ली न्यायालयाला दिलं आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अपराधाबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं, असं याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे. जॅकलीन कुठल्याही गुन्ह्यात सहभागी नव्हती, असंही म्हटलं गेलं आहे. आता याप्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






जॅलकीनवर आरोप काय आहे? 


सुकेश चंद्रशेखरसोबत मैत्री झाल्यानंतर त्याने जॅकलीनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्याने जॅकलीनवर तब्बल सात कोटी रुपये खर्च केले होते. महागडी ज्वेलरी, चार पर्शियन मांजरी, 57 लाख रुपयांचा घोडा हे सगळं गिफ्ट केलं होतं. त्याचप्रमाणे जॅकलिनच्या बहिणीलादेखील त्याने महागडे गिफ्ट दिले होते. 
जॅकलिनच्या आई वडिलांनादेखील त्याने पोर्शे आणि मर्सिडीज या कारही भेट दिल्या होत्या. यांची किंमत 2 कोटींच्या पुढे आहे.


जॅकलिनच्या वतीने तिचे वकील प्रशांत पाटील हे तिची बाजू लढत आहेत. जॅकलिनला सुकेशबाबत काहीही माहीत नाही. तो काय करतो तेदेखील तिला ठाऊक नाही. जॅकलिनला सुकेशने हे सांगितलं होतं की तो मोठा व्यावसायिक आहे. जॅकलिन स्वतःच या प्रकरणातली पीडित आहे असंही प्रशांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.