Prem Pratha Dhumshaan : सिंधुदुर्गातील गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshaan) या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार असून, 4 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गावांमध्ये गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठराविक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र, आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट तयार झाला आहे.
पाहा ट्रेलर :
मात्र, या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. गावपळण या प्रथेविषयीच सगळ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला, लोकसंस्कृतीवर आधारित ‘प्रेम प्रथा धुमशान’ नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान घालणार यात शंका नाही.
मालवणी भाषेतील गाणीही चर्चेत!
ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातलं ‘धुमशान घाला रे’ हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.
‘धुमशान घाला रे’ (Dhumshaan Ghala Re) हे मालवणी बोली भाषेतील गाणं आहे. धमाल शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत या गाण्याला लाभलं आहे. मालवणी गाणी फारच मोजकी असल्यानं या नव्या धमाल गाण्याची आता त्यात भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अत्यंत वेगळ्या प्रथेवर या चित्रपटातील कथा बेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच चर्चा आहे. मात्र, आता ‘धुमशान घाला रे’ हे गाणं मालवणी माणसांसह समस्त चित्रपटप्रेमींना ताल धरायला लावणारं आहे.
हेही वाचा :
Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमात; टीझर आऊट