Alia Bhatt: बॉलिवूडमधील चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टला (Alia Bhatt) आज बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन दहा वर्ष झाली. या दहा वर्षात आलियानं चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारुन नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी जनरल नॉलेजमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलियाला अनेक वेळा ट्रोलर्सनं ट्रोल केलं. पण या ट्रोलर्सकडे लक्ष न देता आलियानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली. 2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इअर या चित्रपटामधून आलियानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर केलं. करण हाच आलियाचा बॉलिवूडमधील 'गॉड फादर' आहे, असंही अनेकांचे मत आहे. आज बॉलिवूडमध्ये आलियानं दहा वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्तानं जाणून घेऊयात आलियाचे प्रेक्षकांची पसंती मिळालेले काही चित्रपट...
हायवे
स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये आलियाचा हायवे हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 28.43 कोटींची कमाई केली.
उडता पंजाब
हायवेनंतर आलियाचे टू स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, शानदार आणि कपूर अँड सन्स हे चार चित्रपट रिलीज झाले. पण हे चारही चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर 2016 मध्ये आलियाचा उडता पंजाब हा चित्रपट रिलीज झाला. आलियासह करीना कपूर, शाहिद कपूर अशी तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 58.14 कोटींची कमाई केली.
राझी
राझी या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं अनेक लोक आजही कौतुक करतात. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला. राझी या चित्रपटामध्ये आलियानं एका सिक्रेट एजंटची भूमिका साकरली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 122.39 कोटींची कमाई केली.
गंगूबाई काठियावाडी, गली बॉय आणि डार्लिंग्स या चित्रपटांमधील आलियाच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात आलिया आणि तिचा पती रणबीर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा