Shilpa Shetty On Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आता बॉलिवूड कलाकारही व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'लाडकी बहीण योजने'वर आपले मत व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'मु्ख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चे कौतुक केले आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राज्यातील महिलांना दिलासा देणारे असल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटले आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे. या महिलांना दर महिन्याला आर्थिक आधार मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे, याचा आनंद वाटत असल्याचे शिल्पाने सांगितले.
राज्य सरकारने हे उचललेले पाऊल म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करत असल्याचे शिल्पा शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. दरम्यान, नुकतेच सरकारने या योजनेच्या नियमात अनेक महत्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे.
सध्या 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा केले जात आहेत. 31 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांनादेखील सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील.