Shekhar Suman : बॉलिवूडचा अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी (Hiramandi)' या वेब सीरिजमध्ये शेखर सुमनने भूमिका साकारली आहे. शेखर सुमनच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. आता शेखर सुमन पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने वादात सापडण्याची चिन्हे आहेत. शेखर सुमनचे मुंबईबद्दल वक्तव्य वादात अडकण्याची चिन्ह आहेत. शेखर सुमनने मुंबईची तुलना जंगलाशी केली. मुंबईत माणसं नाही राहत तर जनावरं राहतात, त्यांना माणूस म्हणण्याची लाज वाटत असल्याचे शेखर सुमनने म्हटले.
मुंबईत भीतीदायक लोक...
इशानच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शेखरला मुंबई आणि लखनऊ या शहरांमधील फरक विचारला असता तो म्हणाला, मुंबई हे शहर नाही. हे जंगल आहे. इथे लोक राहत नाहीत, इथे सगळे भीतीदायक लोक राहतात. इथला प्रत्येकजण रोबोट झाला आहे. इथले लोक दगड आहेत आणि ते काहीही असले तरी त्यांना हृदय आणि आत्मा देखील आहे. हे सर्वजण जंगलात भटकत आहेत. कोणतेही नियम आणि कायदे नाहीत. इथे वेडे लोक आहेत, त्यांना काय म्हणावे? त्यांना माणूस म्हणायला मला लाज वाटते असेही शेखर सुमनने म्हटले. या जंगलात राहायचे असले तर तुम्हाला स्वत: तुमचा रस्ता तयार करावा लागतो.
माझ्याकडे कोणताही पर्याय नाही
शेखर सुमनने पुढे म्हटले की, त्याच्याकडे मुंबईत राहण्याशिवाय पर्याय नाही. एक सुरक्षित ठिकाण प्रत्येकाला शोधावे लागेल. हे जंगल आणि राक्षसी लोकांपासून तुम्ही जितके लांब राहाल, तितकं आयुष्यात शांतता लाभेल आणि जितक्या जवळ जाल, तेवढं तुम्ही फसाल असेही शेखर सुमनने म्हटले.
मूळचा बिहारमधील पाटणा शहरातील असलेला शेखर सुमन हा 1980 पासून मुंबईत राहत आहे. कामाच्या शोधात आलेल्या शेखरला अवघ्या काही दिवसात मुंबईत काम मिळाले. 1990 च्या दरम्यान शेखर सुमनला यश मिळू लागले. छोट्या पडद्यावर शेखर सुमन कमालीचा यशस्वी ठरला.
'हीरामंडी'मुळे शेखर सुमन चर्चेत! (Heeramandi Web Series Details)
अभिनेता शेखर सुमन सध्या आपल्या हीरामंडी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजमधील शेखर सुमनच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. या सीरिजमध्ये शेखर सुमनसोबत त्याचा मुलगा अध्य्यन सुमनदेखील दिसत आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, फरीदा जलाल आणि फरदीन खान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'हीरामंडी'नंतर शेखर सुमनच्या आगामी चित्रपटांची आणि वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. शेखर सुमनने काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.