Chandu Champion First Look Kartik Aaryan :   कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. शूटिंग सुरू झाल्यापासून ते रॅपअपपर्यंत आणि त्यानंतर रिलीज डेटपासून ट्रेलरपर्यंत प्रत्येक माहिती टीम शेअर करत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटातील कार्तिकचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. चंदू चॅम्पियनमधील भूमिकेसाठी कार्तिक आर्यनने जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. 


'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक जारी 


'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक हा अपेक्षेपेक्षाही दमदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन हा लंगोटवर असून जीव तोडून धावताना दिसत आहे.  फर्स्ट  लूकमध्ये कार्तिक आर्यन खूप आत्मविश्वासाने दिसत आहे आणि पोस्टरमध्ये आर्यनची मेहनत आणि शारीरिक बदल स्पष्टपणे दिसत आहेत. या पोस्टरवर लिहिले आहे, "एक माणूस ज्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला". कार्तिकच्या या पोस्टरमधील लूकवरू कार्तिक या चित्रपटात आपला दमदार परफॉर्मेन्स देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  


कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वात आव्हानात्मक आणि विशेष चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना तो खूप उत्साहित आहे. 


चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 






कोणावर आधारीत आहे चित्रपट?


चंदू चॅम्पियन या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन हा भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारणार आहे. मुळचे सांगली येथील असणारे पेटकर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग  घेतला होता. 1972 च्या सुमारास झालेल्या जर्मनीतील पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. 


कार्तिकने शिकली मराठी 


‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक अत्यंत वेगळी भूमिका वठवत असून ती हुबेहूब साकारण्यासाठी त्याने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही.या चित्रपटात कार्तिकला अस्खलित मराठी बोलता यावे म्हणून त्याने गेली 14 महिने कठोर मेहनत घेतली आहे.


कधी रिलीज होणार चंदू चॅम्पियन?


'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान याने केले आहे. साजिद नाडियाडवाला  आणि कबीर खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 14 जून रोजी रिलीज होणार आहे.