Shekhar Bapu Rankhambe On 69 National Film Award : सांगलीच्या शेखर बापू रणखांबेने (Shekher Bapu Rankhambe) 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारावर  (69 National Film Awards) नाव कोरलं आहे. शेखरच्या 'रेखा' (Rekha) या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"राष्टीय पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे".


एबीपी माझाशी बोलताना शेखर म्हणाला,"अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न अखेर साकार झालं आहे. मनोरंजनसृष्टीत पदार्पण केल्यापासून प्रत्येक वर्षी एन्ट्री पाठवायचो. या संघर्षाच्या काळात अनेकांनी मदत केली आहे. स्वप्न माझं होतं पण ते इतरांनीही त्यांचं स्वप्न करुन घेतलं. या पुरस्काराच्या यशात निर्माते रवी जाधव आणि मेघना जाधव यांचा मोलाचा वाटा आहे". 


शेखर पुढे म्हणाला,"एका प्रोजेक्टच्या कामासाठी सध्या मी गावी आहे. पुरस्कारांची घोषणा होत असताना आमचं त्या प्रोजेक्टवरच काम सुरू होतं. दरवर्षी आम्ही एन्ट्री पाठवायचो पण पुरस्कार जाहीर होत नसे. त्यामुळे एन्ट्री पाठवली असली तरी मी पुरस्कार जाहीर होतानाचा कार्यक्रम पाहत नव्हतो. आमचं प्रोजेक्टवर काम सुरू असताना टीममधील एका मुलीला मला पुरस्कार जाहीर झाल्याचं कळलं आणि त्यानंतर जल्लोष सुरू झाला. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यापासून जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे".


आता मला कोट शिवायला लागणार : शेखर बापू रणखांबे


शेखर म्हणतो,"आपल्याला जे सांगायचं आहे ते आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद आहे. मागच्या वर्षीच्या माझ्या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळेल, असं मला आणि इतरांनाही वाटलं होतं. पुरस्कार सोहळ्यात परिधान करायला कोट शिवून घे असंही मित्रांनी मला सांगितलं होतं. पण तसं काही झालं नाही. पण यंदा मी स्वत:हून त्या सर्वांना म्हणालो की आता मला कोट शिवायला सांगू नका...मिळाला तर बघू...पण आता खरचं शिवावा लागणार आहे". 


सांगली जिल्ह्यातील पेड या गावात शेखर बापू रणखांबेचा जन्म झाला आहे. बारावीपर्यंतचं शिक्षण पेड या गावात पूर्ण केल्यानंतर शेखरने मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर एकांकिका, नाटक, सहाय्यक दिग्गदर्शन अशा गोष्टींच्या माध्यमातून मनोरंजनाची आवड निर्माण झाली. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या शेखरचे वडील मोलमजुरी करुन घर चालवतात. 


युवा दिग्दर्शक शेखर बापू रणखांबेच्या (Shekhar Bapu Rankhambe) 'रेखा' (Rekha) या लघुपटाला 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात (69 National Film Awards) नॉन फिक्शन कॅटेगरीमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्ड जाहीर झाला आहे. सांगलीच्या पठ्ठ्याने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरल्याने सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. 


संबंधित बातम्या


Rekha Short Film :  ‘स्वराज्य महोत्सव’ राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत 'रेखा'ची बाजी; सांगलीतल्या युवा दिग्दर्शकाच्या कलाकृतीला भरभरुन दाद