नवी दिल्ली : बॉलिवूड सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ सिनेमावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून सिनेमाविरोधात आंदोलनं सुरु आहेत. त्यामुळे भन्साळीच्या समर्थनार्थ बॉलिवूड उतरलं. दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्वीट करुन, ‘पद्मावती’ सिनेमापेक्षा राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.


शशी थरुर यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “पद्मावती सिनेमाबद्दलच्या वादामुळे राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची संधी आहे, ना की सहाव्या शतकातील महाराण्यांच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची. राजस्थानात महिला साक्षरतेचं प्रमाण अतिशय कमी आहे. वास्तिवक, महिलांच्या डोक्यावर पदर असण्याच्या बंधनापेक्षा शिक्षण अतिशय गरजेचं आहे.”

संजय लीला भन्साळीचा पद्मावती हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या विषयाला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. विशेष करुन, राजपूत समाजाचा दावा आहे की, ‘सिनेमामध्ये इतिहासासोबत छेडछाड होत असून, महाराणी पद्मावतींची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने चित्रित केली जात आहे.’

पण सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळीने राजपूत समाजाचा दावा फेटाळला आहे.

दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि भाजप नेते अर्जुन गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात भन्साळीवर देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

कोण होती राणी पद्मावती?

सिंघलचे राजा गंधर्वसेन यांची कन्या पद्मावती. नितळ… आरस्पानी… आणि मनमोहक… सौंदर्याची खाण. ती इतकी सुंदर होती… की तिला मिळवण्यासाठी बड्या बड्या राजांनी देव पाण्यात ठेवले होते.

वडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. या स्वयंवरासाठी अनेक राजे उपस्थित होते. पण राणी पद्मावतीने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं.

पद्मावतीच्या सौंदर्याबाबत दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी ऐकून होता. त्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीननं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या सात मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला.

अखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं.

पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली.

पद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली.

अखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत 700 दासी घेऊन येण्याची अट घातली.

पद्मावतीने 700 दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.

दगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला.

राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.

अशी होती… चित्तोडची स्वाभिमानी राणी… राणी पद्मावती…

संबंधित बातम्या

'पद्मावती' वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात

‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!

‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?

बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?