नवी दिल्ली : ‘पद्मावती’च्या रिलीजसाठी संपूर्ण बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलं आहे. सिनेमा दिग्दर्शन संघटनेसह इतर पाच संघटनांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची मागणी केली.


पद्मावतीला होत असलेल्या विरोधाचा शांततेच्या मार्गाने निषेध करण्याचा निर्णय दिग्दर्शक संघटनेने घेतला आहे. या काळात 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत 4 ते 4.15 या काळात एकाही सिनेमाची शुटिंग होणार नाही. प्रत्येक वेळीच दिग्दर्शकाला लक्ष्य केलं जातं. यावेळी आम्ही सर्व जण सोबत आहोत. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भन्साळींसोबत जे झालं, त्यामुळे सर्व बॉलिवूड निशाण्यावर आलं आहे, असं दिग्दर्शक संघटनेतील अशोक पंडित यांनी सांगितलं.

या प्रकरणात राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांनी भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्व संघटनांनी केली आहे. दिग्दर्शक संघटनेसह टीव्ही आर्टिस्ट संघटना, सिनेमाटोग्राफर संघटना, स्क्रीन प्ले संघटना, कला दिग्दर्शक संघटना आणि वेशभूषाकार संघटना भन्साळींच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.

महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. राणी पद्मावती आणि राजामध्ये काही इन्टिमेट सीन्स आहेत, तर राणी आणि खिल्जी यांच्यात एकही रोमँटिक सीन नाही.

भन्साली यांचा हा चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक अडथळ्यांचा सामना करत आहे. आधी भन्साली निर्मात्यांचा शोध घेत होते. यानंतर जयपूरमध्ये शूटिंगदरम्यान विरोध झाला होता, तर खुद्द भन्सालींना मारहाणही करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

‘पद्मावती’तील दीपिकाचा फर्स्ट लूक, रीलिज डेटही निश्चित!

‘पद्मावती’त रणवीर सिंगच्या प्रियकराच्या भूमिकेत जिम सर्भ?

बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’चा लोगो रिलीज, फर्स्ट लूकची उत्सुकता शिगेला!

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?