मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचार सुरु आहे. त्यासोबतच अलीगड मुस्लीम विद्यापीठातही मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत हिंसक आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी एक बसदेखील पेटवली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडादेखील झाला.


दगडफेक करणाऱ्या जामियामधील विद्यार्थ्यांवर पोलिसांना कारवाई करावी लागली. या कारवाईविरोधात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांचं मत मांडलं आहे. जामियाचा विद्यार्थी असूनदेखील शाहरुख खानने याप्रकरणावर बोलणे टाळले आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया कधी येणार असा सवाल जामियाच्या विद्यार्थ्यांनी आणि नेटीझन्सनी उपस्थित केला आहे.


अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री सातत्यांनी जामिया मिलिया बाबत ट्वीट करत आहेत. अनेकांनी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांना विरोध केला आहे. याचदरम्यान, रेडिओ जॉकी आणि अभिनेता रोशन अब्बास याने शाहरुख खानला ट्विटरवर टॅग करुन एक ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.


रोशन अब्बासने ट्वीट केलं आहे की, शाहरुख खान तुम्ही या मुद्द्यावर काहीतरी बोलायला हवं. तुम्ही तर जामियाचेच विद्यार्थी आहात. तुमचं तोंड कोणी बंद करुन ठेवलं आहे. सध्या सुरु असलेल्या या गदारोळाबद्दल तुम्ही काहीही बोलायला तयार नाही. तुम्ही जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी आहात, आज त्याच जामियामध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल तुम्ही बोलायला हवं.


दरम्यान, रोशन अब्बासचे ट्वीट रिट्वीट करत, त्यावर कमेंट करत अनेक नेटीझन्सनी शाहरुख शांत असल्यामुळे त्याच्यावर टीका केली आहे. तर शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याची बाजू घेतली आहे. शाहरुखच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, जर शाहरुख देशातल्या राजकीय परिस्थितबद्दल काही बोलला तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. जर शाहरुख काही बोलला नाही तर त्याला भित्रा म्हटलं जातं.






आंदोलनांच्या केंद्रस्थानी असलेल्या जामिया आणि अलीगड विद्यापीठांचा इतिहास