Shah Rukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' (Pathaan) या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं किंग खानच्या उपस्थितीत 'आयपीएल 2023'मध्ये (IPL 2023) कोलकाता (Kolkata) संघाने (KKR) घरच्या मैदानावर आरसीबीवर (RCB) दणदणीत विजय मिळवला. शाहरुख खानचे विराट कोहलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान किंग खानने कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे. 


कोलकातातील मॅच पाहण्यासाठी शाहरुख खानसह सुहाना खान आणि शनाया कपूरनेदेखील हजेरी लावली होती. स्टेडिअमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण सध्या शाहरुख खानचे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


शाहरुखने घेतली अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची भेट


शाहरुखच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर किंग खानचे अॅसिड हल्लाचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खानने काळा शर्ट आणि रिप्ड जीन्स परिधान केलेली दिसत आहे. लाडक्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढताना अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. 






चाहत्यांकडून शाहरुखचं कौतुक


शाहरुखने त्याच्या व्यस्त वेळापत्रकात अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींची भेट घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत. शाहरुख खान खरचं माणूस म्हणून खूप चांगला आहे. किंग ऑफ हार्ट्स, शाहरुख सुपरस्टार असला तरी आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत. 


'जवान' ते 'डंकी'; सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी शाहरुख सज्ज!


शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तसेच त्याचा 'जवान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या तो एका सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं असून या सिनेमात तो तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुखच्या या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


IPL 2023 : RCB चा पराभव, KKR चा विजय; शाहरुखची मैदानातच विराटला कडकडून मिठी, गालही ओढला, Video होतोय व्हायरल