Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आहे. शाहरुखला 'पठाण' (Pathaan) सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा (Y+ Category Security) पुरवली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शाहरुख खानला याआधी दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे.
शाहरुखच्या घरावर चोवीस तास पहारा
शाहरुख खान आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या सहा प्रशिक्षित कमांडोच्या टीमसोबत नेहमीच असेल. जे एमपी गन, एके-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने सुसज्ज असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या सुरक्षेशिवाय त्याच्या घरावर चोवीस तास शस्त्रांसह मुंबई पोलिसांचे चार कर्मचारी पहारा देतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यावेळी त्याच्या सुपक्षेखाली प्रशिक्षित कमांडो तसेच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन असेल. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनामुळे शाहरुखच्या गाडीसमोर कोणीलाही येता येणार नाही. वाहतूक सुरळीत करण्यास हे वाहन मदत करेल.
शाहरुख आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानलादेखील (Salman Khan) Y+ सुरक्षा पुरवण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता सलमाननंतर शाहरुखलादेखील Y+ स्कॉट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
शाहरुखसाठी 2023 वर्ष खास!
शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरत आहे. त्याच्या 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. दुसरीकडे चाहते आता अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' (Dunky) सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'पठाण' या सिनेमामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याला धमक्याही दिल्या जात होत्या. त्यामुळे सरकारने अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्याला Y+ Category Security देण्यात आली आहे.
'पठाण' या सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन गेमिंग प्रकरणी अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. याआधी 2010 मध्ये 'माय नेम इज खान' (My Name Is Khan) या सिनेमामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
संबंधित बातम्या