लॉस एंजेलिस (अमेरिका): किंग खान शाहरुखला अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळावर रोखल्यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. असा प्रकार परत न होऊ देण्याचं आश्वासनही दिलं आहे. शाहरुखला लॉस एंजेलिस विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.


 

शाहरुखने या सर्व प्रकाराबाबत ट्विटरद्वारे माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेतील भारताचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी ट्विटरद्वारे शाहरुखची माफी मागितली. यापुढे असा प्रकार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाईल, असं आश्वासन वर्मा यांनी दिलं आहे.

 

अडवल्याचा शाहरुखला असाही फायदा

विमानतळावर अडवल्यामुळे एकीकडे संताप व्यक्त करताना किंग खानने आनंदही व्यक्त केला आहे. कारण चौकशीसाठी थांबवून ठेवलं त्या काळात आपल्याला भरपूर पोकेमॉन सापडले, असंही ट्वीट शाहरुखने केलं आहे. चौकशीसाठी थांबवल्यावर वेळ घालवण्यासाठी आपण पोकेमॉन गेम खेळलो, असं शाहरुखने सांगितलं.

 

शाहरूखसोबत 2012 मध्येही न्यूयॉर्क एअरपोर्टवर असाच प्रकार घडला होता. यानंतर अमेरिकेने या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. शाहरुखला 2009 मध्येही न्यू जर्सी येथे अडवण्यात आलं होतं. दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'स्पॉटेड' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी जात होता.

 

संबंधित बातमीः  शाहरुख अमेरिकेतील एअरपोर्टवर ताब्यात, किंग खान संतप्त