Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह असलेल्या  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. किंग खानचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. शाहरुखचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी यशराज फिल्म्सतर्फे चाहत्यांना खास सरप्राईज मिळणार आहे.


शाहरुखने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. मात्र 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (DDLJ) या सिनेमाने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे आज किंग खानच्या वाढदिवशी यशराज फिल्म्सने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सुपरहिट रोमॅंटिक सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित केले आहे. 


प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत स्क्रिनिंगची माहिती दिली आहे. इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आपली आवडती प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावर... 2 नोव्हेंबर 2022 रोजी सिनेमागृहांमध्ये पाहा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे".






'पठाण'चा टीझर होणार आऊट


शाहरुखच्या बहुचर्चित 'पठाण' या सिनेमाचा टीझरदेखील आज त्याच्या वाढदिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 25 जानेवारी 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किंग खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


रिपोर्टनुसार, पठाण या सिनेमात काम करण्यासाठी शाहरूखनं 85 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 'ओम शांती ओम' आणि 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटांमधील शाहरूख आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता पठाण या चित्रपटात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी