गेल्या काही वर्षांपासून #MeToo मुव्हमेंटने जोर धरला. अनेक प्रकरणं बाहेर आली. याचा फटका बऱ्याच पुरूषांना बसला. अनेक लोकांची करिअरं धोक्यात आली. शायनी आहुजाचं उदाहरण ताजं आहेच. चांगला मोठा होणारा कलाकार इंडस्ट्रीतून बाहेर फेकला गेला. खंरतर कोणाही महिलेवर तिच्या मर्जी शिवाय जवळीस साधणं वाईटच. त्याबद्दल तर सेक्शन ३७५ बोलतो. एखादी महिला तुमच्या कितीही जवळची असली तरी तुम्ही तिच्याशी जवळीस साधत असाल तर त्यावेळी त्यासाठी तिचा होकार आणि इच्छा असणं अनिवार्य आहे. ते नसताना जर असा काही व्यवहार झाला तर तो विनंयभंग ठरतो. हा झाला कायदा. महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा बनवला गेला हे खरं. पण त्याचा दुरूपयोगही होताना दिसू लागला. त्याचीच ही गोष्ट सेक्शन ३७५.


अजय बहल दिग्दर्शित या सिनेमा अक्षय खन्ना, रिचा चढ्ढा, किशोर कदम आदींच्या भूमिका आहेत. गोष्ट थेट आहे. एका नामांकित दिग्दर्शकाकडे काम करणारी एक असिस्टंट कॉश्चुम्स घेऊन दिग्दर्शकाच्या घरी येते. या दोघांमध्ये जवळीक घडते आणि तिथून निघाल्यानंतर ती मुलगी या दिग्दर्शकाविरोधात पोलिसात तक्रार करते. त्यानंतर सुरू होतो कोर्टरूम ड्रामा.
या कोर्टात महिलेची बाजू मांडते रिचा चढ्ढा अर्थात मिस गांधी.. आणि दिग्दर्शकाच्या बाजूने उभा राहतो अक्षय खन्ना म्हणजे तरूण सलूजा.. मग वाद प्रतिवाद, साक्ष पुरावे यांची श्रूंखला सुरू होते. खरंतर अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यामध्ये जवळीक घडते ते दोघे एकांतात असल्यामुळे पुराव्यांच्या, साक्षींच्या आधारेच परिस्थितीचा कयास लावला जाऊ शकतो. इथेही तसं झालं आहे. नेटकी पटकथा, उत्तम अभिनय, लक्षात राहणारे संवाद यामुळे हा सिनेमा खिळवून ठेवतो.

या सिनेमात न्यायाबद्दल.. कायद्याबद्दल दिलेल्या उपमा चांगल्या आहेत. 'जस्टिस इज एबस्ट्रॅक्ट अँड लॉ इज अ फॅक्ट' असे अनेक संवाद चांगले झाले आहेत. हा सिनेमा खरंतर सर्वांनी पाहायला हवा. दोन्ही बाजू अत्यंत नेमक्यापणाने मांडल्या गेल्या आहेत. महिला सक्षमीकरण आवश्यक आहेच. पण त्याचबरोबोर याच कायद्याचा बऱ्याचदा बदला घेम्यासाठीही वापर होतो. त्याचाही उल्लेख इथे करण्यात आला आहे.

यात मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत. आजच्या काळात या सेक्शन ३७५ कडे आपण लक्ष द्यायला हवंच. म्हणून या सिनेमाचं महत्व आहे. पिक्चर-बिक्चरमध्ये या सिनेमाला आपण देतो आहेत तीन स्टार्स. हा सिनेमा पाहावा असा आहे.