मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत गट-तट आणि राजकारण यांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे. यामुळे मोठा गाजावाजा करत मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात आलेली उर्मिला सहा महिनेही काँग्रेसमध्ये रमू शकली नाही हे स्पष्ट झालं आहे.
उर्मिला मातोंडकरने या वर्षी 27 मार्च रोजी नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पक्षप्रवेशादरम्यान तिने तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेटही घेतली होती. आपण काँग्रेसच्या विचारधारेला मानतो आणि फक्त निवडणुकीपुरता पक्षात आलेलो नाही, असंही तिनं पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु सहा महिन्याच्या आतच पक्षातील गटबाजीला कंटाळून तिने काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
"16 मे रोजी लिहिलेल्या पत्रावर कारवाई झाली नाही. ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या, त्यांना पदं मिळाली. कोणी मला वापरु नये, यासाठी पक्षाचा राजीनामा देत आहे," असं तिने प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे. तसंच लोकसंसाठी काम करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं.
मुंबई काँग्रेससाठी मोठ्या उद्दिष्टांकरता काम करण्याऐवजी पक्षातल्या अंतर्गत स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यांच्यातल्या लढायांसाठी माझा वापर करु देणं माझ्या राजकीय आणि सामाजिक जाणीवांना मान्य नाही," असंही उर्मिलाने निवेदनात म्हटलं आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप तिने यापूर्वीच केला होता. 16 मे रोजी याबाबत पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रारही तिने केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातली अंतर्गत धुसफूस, राज्य पातळीवरील नेत्यांची उदासिनता याचाही या वादाला संदर्भ आहे.
उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. बॉलिवूड सेलेब्रिटी, उत्तम वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व असूनही उर्मिलाला गोपाळ शेट्टींना मात्र मात देता आली नाही. शेट्टींना 7 लाख 6 हजार तर उर्मिलाला 2 लाख 41 हजार मतं मिळाली.
संबंधित बातम्या