सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे असं मानलं जांतं. म्हणून सिनेमाचा दिग्दर्शक कोण आहे त्यावर बरंच काही ठरत असतं. आयुषमान खुराना अभिनित ड्रीमगर्ल हा राज शांडिल्य यांचा सिनेमा आहे. राज हे हिंदीतले मोठे लेखक आहेत. टीव्हीवर त्यांनी लिहिलेली स्कीटस खूप गाजली आहेत. कॉमेडी सर्कस, कपिल शर्मा शो अशी मिळून त्यांनी 600 वर स्किटस लिहिली आहेत. त्यांची नोद लिमका बुकमध्येही झाली आहे. तर अशा लेखकाने ड्रीमगर्ल हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे राज यांच्यातला लेखकाने त्यांच्यातल्या दिग्दर्शकावर प्रभाव पाडला आहे आणि सिनेमाचं जे व्हायचं ते झालं आहे.
खरंतर आयुषमान खुरानाने यापूर्वी केलेले सिनेमे पाहिले तर त्याच्या प्रत्येक सिनेमातून अनेक अपेक्षा बाळगल्या जातात. यापूर्वीचे त्याचे सिनेमे म्हणजे विकी डोनर, बधाई हो, बरेली की बर्फी, अंधाधुन, आर्टिकल 15 आदी. या प्रत्येक सिनेमाची गोष्ट आणि त्याची पटकथा ही कमाल होती. म्हणून समीक्षकांनी या सिनेमाला गौरवलंच शिवाय या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली. तीच अपेक्षा घेऊन आपण ड्रीमगर्ल पाहायला जातो. अपेक्षेनुसार या सिनेमाची गोष्ट गमतीदार आहे. करम नावाच्या मुलाला उपजत बाईचा आवाज लाभलेला असतो. त्याच आवाजावर त्याला कॉल सेंटरमध्ये नोकरी लागते तिचं नाव असतं 'पूजा'. मग हीच पूजा फेमस होते. इतकी की ती करमला त्रास देऊ लागते. मग पुढे काय होतं.. तो या पूजाच्या आवाजातून कसा बाहेर पडतो त्याचा हा सिनेमा बनला आहे.
सिनेमाची गोष्ट गमतीदार आहे. पण तेवढीच लाईन पकडून सिनेमा पूर्ण झाला आहे. बाकी दिग्दर्शकाने इतर मसाला त्यात भरला आहे. या सिनेमात वन लाईनर्सचा भरणा आहे. पण असे वन लाईनर्स आपण आपल्या टीव्हीवरही पाहतो. पण सिनेमात जी गोष्ट पुढे जायला हवी ती जात नाही. गोष्टीत फार वाढवता न आल्यामुळे अनेक हस्यास्पद प्रसंग निर्माण करावे लागले आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो आजीला स्कॉच पाजण्याचा.. राधेराधे गाण्याच्या आधीच्या काही प्रसंगांचा.. ती पूजा प्रत्येकाशी खूप रोमॅंटिक बोलतानाच दाखवली आहे. सतत तिची चुम्माचाटी सुरू असते. पण क्लायमॅक्समध्ये जेव्हा नायक पूजाची बाजू घेतो तेव्हा आज आपल्याला संवाद साधायला कोणी नसण्यावर बोलतो आणि आपल्या कुटुंबात अशा पूजा असल्याचं सुचवतो. पण मनातलं बोलायला प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रॉब्लेम असतात हे लक्षात घ्यायला हवं. इथे सगळे लोक पूजाकडे फक्त वासनेच्या नजरेनंच पाहताना दिसतात. प्रत्येकाला पूजासोबत संबंध प्रस्थापित करायचे आहेत. म्हणजे, सिनेमात दिसतं एक आणि दिग्दर्शक सूचित करतो काही वेगळं. यामुळे जरा घोळ होतो. हा घोळ शेवटच्या काही क्षणात पूजाचा मर्डर होण्यापर्यंत जातो तेव्हा मात्र दिग्दर्शकाचा पूर्ण बावचा झालाय असं लक्षात येतं.
अशा सगळ्या अनाकलनीय गोष्टींमुळे हे ड्रीम थोडं 'डीम' होतं. त्यातली पटकथा तगडी असती तर ही ड्रीमगर्ल आणखी ब्राईट झाली असती यात शंका नाही.
केवळ अभिनय आणि गमतीदार कथाबीज यावर सिनेमा होल्ड होतो. या सिनेमात आयुषमान आहेच. पण त्याहीपेक्षा कहर केला आहे तो अनु कपूर आणि विजय राज यांनी. यातलं टेलिफोन, राधेराधे ही गाणी बरी आहेत. राधे राधेची कोरिओग्राफी पाहायला मस्त वाटते. पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स. चांगला होता होता राहिलेला सिनेमा वाटतो. पण नुसता टाईमपास करायचा असेल आणि खिशात पैसे असतील तर या बघून. तेवढाच टाईमपास.