Sayaji Shinde : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साताऱ्यात (Satara) त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.  काल (11 एप्रिल 2024) छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 


सयाजी शिंदेंची प्रकृती ठिक : डॉक्टरांची माहिती


सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाले,"सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे रुटीन म्हणून त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये काही मायनर चेंजेस सापडले. त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं".


सयाजी शिंदेंना लवकरच मिळणार डिस्चार्ज


डॉक्टर पुढे म्हणाले,"स्ट्रेस टेस्टही त्यांची करण्यात आली होती. यातही मायनर दोष सापडले. अँजिओग्राफी करण्याचा आम्ही त्यांना सल्ला दिला होता. पण दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचं एक शूटिंग रद्द झालं आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्याचं ठरवलं. हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये एक 99 टक्याच्या ब्लॉक आढळला. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकतेने या सर्व गोष्टी पाहिल्या. हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. 


सयाजी शिंदे यांच्याबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले,"शूटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात. पण झोकून देतानाही शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पुन्हा चांगलं काम करू शकतील".


सयाजी शिंदे यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who is Sayaji Shinde)


सयाजी शिंदे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी-हिंदीसह कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी सिने-निर्मितीही केली आहे. सयाजी शिंदे अभिनेते असण्यासोबत वृक्षप्रेमीदेखील आहेत. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या गाजलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आहे. आता त्यांच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिरयानी'नावात दडलंय काय? साऊथ चित्रपट का ठरतायत हिट? नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे भरभरुन बोलले