राजकुमार हिरानी यांच्या सिनेमाकडे लोकांचं बारीक लक्ष असतं. कारण त्यांनी या पूर्वी दिलेल्या सिनेमांमुळे ही अपेक्षा वाढते. पीके, थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई हे सिनेमे पाहिलं तर एक लक्षात येतं की हे सिनेमे मनोरंजन करतातच, शिवाय, डोळ्यांत अंजन घालतात. 'संजू'ही याला अपवाद नाही. संजय दत्त हिरानी यांचा चांगला मित्र आहे. त्याचं आयुष्य मांडताना नेमकं काय घ्यावं, किती घ्यावं हा प्रश्न दिग्दर्शकाला पडला असेल यात शंका नाही. पण म्हणून त्यांच्यातला संकलक अशावेळी मदतीला आला आहे. सगळं आयुष्य समजून घेतल्यानंतर संजय दत्त यांचे चार टप्पे त्यांनी निवडले. रॉकी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून सिनेमा सुरु होतो. रॉकी ते अलिकडे त्याचं जेलमधून सुटणं व्हाया व्यसनाधीनता ते शस्त्रास्त्र बाळगण्याप्रकरण असा हा टप्पा आहे. या सिनेमात नर्गिस, सुनील दत्त, कमलेश, प्रिया, रुबी, मान्यता अशा व्यक्तिरेखा येतात. त्याचसोबत हनीफ, अबू सालेम, सुनील अशी काही नावंही येतात. या सिनेमात टप्पे चारच असले, तरी हा सिनेमा कंटाळवाणा होत नाही.


हिरानी यांना या सिनेमातून काय दाखवायचं आहे? किंवा संजय दत्तने हा सिनेमा करायला परवानगी का दिली असेल? त्याचं असं आपलं काही म्हणणं असेल का? तर ते या सिनेमातून कळतं. संजयला दहशतवादी म्हणून संबोधलं गेलं होतं. ती त्याच्या मनातली सल होती. ट्रेलर पाहतानाही ती जाणवते. राजकुमार हिरानी यांनी यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमध्ये जो भाग दिसतो तो सगळा पहिला आहे. म्हणजे सिनेमातला पहिला टप्पा. पण खरा सिनेमा सुरु होतो उत्तरार्धात. कारण आपल्याला हेच जाणून घ्यायचं असतं की संजय दत्तची बाजू मांडण्याचा इथे प्रयत्न झालाय की आणखी काही सांगायचं आहे दिग्दर्शकाला. तर या सिनेमातून संजयचा तो संघर्ष दिसतो. म्हणजे त्याने आपल्या घरी एके-56 लपवल्या. एक नव्हे ती बंदुका होत्या. त्यापैकी दोन त्याने घेऊन जाण्यास सांगितल्या, त्या कुणी त्याला दिल्या हे सगळं नावासह आहे. पण त्याचवेळी त्याने प्रसारमाध्यमांवरही बोट ठेवलं आहे. म्हणजे बातमीला मसाला लावण्यासाठी हेडलाईन देऊन मोकळं होताना पुढे जे प्रश्नचिन्ह लावलं जातं, त्यावर 'संजू' प्रश्न निर्माण करतो. या हेडलाईन्सने आपल्याबद्दल चुकीची माहिती लोकांर्यंत पोहोचली गेली असं त्यांचं म्हणणं आहे. यावरच्या काही घटनाही यात दिसतात.

या सिनेमातली गोष्ट सुरु होते ती 'संजू'ला शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावली जाते तेव्हापासून. त्यानंतर आपलं आयुष्य पुस्तकरुपाने यावं याचा आग्रह तो विनी नामक लेखिकेला करतो. त्यातून तो आपलं आयुष्य सांगायला लागतो. सुरुवात होते रॉकीपासून आणि शेवटी ते पुस्तक येतं हे उघड आहे. या दरम्या सिनेमा घडतो.

संजय दत्तच्या भूमिकेचं रणबीर कपूरने सोनं केलं आहे. सगळ्यात महत्वाची बाब अशी की समोर रणबीर आहे हे कळत असूनही आपण त्याला संजय दत्त समजू लागतो. याचं श्रेय दिग्दर्शक, कलाकार आणि रंगभूषाकार यांना द्यावं लागेल. त्याच्यासह परेश रावल (सुनील दत्त), नर्गिस (मनिषा कोईराला), मान्यता दत्त (दिया मिर्झा), विकी कौशल यांनीही समजून अभिनय केला आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका अर्थातच रणबीरला करायची होती. संजय दत्तचं दिसणं निभावताना कलाकार म्हणून त्यातल्या प्रसंग वठवणंही आलं. रणबीरने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. मनमौजी असणं दाखवतानाच नंतर त्याला ज्या दिव्यातून जावं लागलं त्या सगळ्यात तो पास झाला आहे. राजू हिरानी यांच्या सिनेमातली प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या लक्षात राहते. संजूही याला अपवाद नाही.

सिनेमा पुढे सरकत राहतो. पण त्याचवेळी प्रसारमाध्यमांवर त्याने ठेवलेलं बोट अधिक गहिरं होत जातं. माध्यमांमुळे टेररिस्ट हा लागलेला कलंक पुसण्याची झटापट यात दिसते. हे सुरु असताना, सिनेमा तुमचं मनोरंजन करत असतोच. सिनेमा पाहात असताना सतत तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावत राहतात. कधी नर्गिस निघून जाते.. कधी हतबल व्यसनाधीन संजू पाहून.. अर्थात हे प्रसंग खूपच तरल झाले आहेत. संजू आणि कमलेशची मैत्रीही अशीच गहिरी आहे. हा सिनेमा बघण्यासारखा आहे हे नक्की. कारण या संपूर्ण सिनेमावर राजकुमार हिरानी यांची छाप दिसते. आणि तेच या सिनेमाचं यश म्हणायला हवं. म्हणूनच या सिनेमाला पिक्चर बिक्चरमध्ये मिळाला आहे रेड हार्ट.

आवर्जून हा सिनेमा बघायला हरकत नाही. जा आणि थिएटरमध्ये सिनेमा पाहा.