मुंबई : "एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता," 'वॉण्टेड' सिनेमातील अभिनेता सलमान खानचा हा डायलॉग अतिशय गाजला होता. परंतु रिअल लाईफमध्येही सलमानने त्याची कमिटमेंट पूर्ण केली आहे.


काही महिन्यांपूर्वी आलेला 'ट्यूबलाईट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. यामुळे चित्रपटाच्या वितरकांना मोठं नुकसान झालं होतं. मात्र सलमान खानने नुकसानीची 50 टक्के रक्कम वितरकांना परत केले आहेत.

वितरकांच्या टीमचे प्रमुख नरेंद्र हिरावत यांनी ट्यूबलाईट सिनेमा 130 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यांनी यासंदर्भात सलमान खानची भेट घेतली. सलमानच्या कुटुंबीयांनी मिळून निर्णय घेतला की, वितरकांना 50 टक्के पैसे परत करायचे. याशिवाय वितरकांच्या हितासाठी जे काही करता येईल ते करेन, असंही खान कुटुंबीयांनी ठरवलं आहे.

मुंबईच्या वांद्र्यातील गॅलेक्स अपार्टमेंटमध्ये मागील महिन्यात झालेल्या बैठकीत सलमानचे वडील सलीम खान वितरकांना म्हणाले होते की, "माझ्या मुलाच्या चित्रपटातून तुमचं मोठं नुकसान झालं याची मला कल्पना आहे. आम्ही हे प्रकरण नीट हाताळत आहोत. जे शक्य आहे ते सगळं करु." मात्र सलमान खान या बैठकीला उपस्थित नव्हता. या बैठकीनंतर वितरक बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, रणबीर कपूरनेही 'जग्गा जासूस' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान म्हटलं होतं की, जर चित्रपट हिट झाला नाही तरी मी वितरकांचं नुकसान होऊ देणार नाही. आता 'जग्गा जासूस'ही बॉक्स ऑफिस अपयशी ठरली. त्यामुळे आता रणबीरही सलमानप्रमाणेच पाऊल उचलतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.