मुंबई : 'पानसिंह तोमर' आणि 'पीपली लाईव्ह' यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते सीताराम पांचाल यांचं निधन झालं. आज सकाळी 8:30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल.

मागील चार वर्षांपासून ते किडनी आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. यादरम्यान त्यांचं वजन कमी होऊन 30 किलोच राहिलं होतं.

सीताराम पांचाल यांनी स्लमडॉग मिलेनिअर, द लीजंड ऑफ भगत सिंह, जॉली एलएलबी 2, सारे जहां से महंगा, हल्ला बोल, बँडिट क्वीन यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. पण अखेरच्या काळात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी महागडे उपचार सोडून आयुर्वेदिक उपचार घेण्याचा प्रयत्न केला.

मित्रांकडून मदत
काही दिवसांपूर्वी त्यांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर एक पोस्टही व्हायरल झाली होती. "मित्रांनो माझी मदत करा. कॅन्सरमुळे माझी अवस्था बिकट होत आहे. तुमचा कलाकार भाऊ सीताराम पांचाल," अशी ही पोस्ट होती.


मागील साडेतीन वर्षांपासून बॉलिवूडमधील त्यांचे काही मित्र मदत करत होते. यामध्ये इरफान खान, पांचाल यांच्या एनएसडी बॅचमेट संजय मिश्रा, रोहिताश गौड, टीवी निर्माता (एक घर बनाऊंगा) राकेश पासवान यांचा समावेश आहे. ट्विटरवर दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांसारख्या अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.

राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सिनेमाशी संबंध
सीताराम पांचाल यांनी लाडो या हरियाणवी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सीताराम पांचाल यांचा जन्म हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यातील डूंडर हेडी गावात 1963 मध्ये झाला होता. त्यांनी 'लाडो' शिवाय 'छन्नो' सिनेमातही काम केलं आहे.

शाळेपासूनच अभिनयाची आवड
पांचाल यांना शाळेपासूनच अभिनयाची गोडी होती. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानतंर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांची निवड झाली. यानतंर त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये विविध चरित्र भूमिका साकारल्या. त्यांच्या घरात पांचाल कमावणारे एकटेच होते. त्यांना 19 वर्षांचा मुलगा असून जो अजून शिकत आहे