मुंबई : मार्च 2020.. म्हणजे गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यातली थिएटर्स बंद झाली. या थिएटर्समध्ये मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, नाट्यगृहं या सर्वांचा समावेश होता. कालांतराने कोव्हिडची पहिली लाट कमी झाली आणि राज्यात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार मल्पिप्लेक्सना परवानगी देण्यात आली. नाट्यगृहंही सुरू झाली. 


मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांना 50 टक्के उपस्थितीची अट होती. पण निदान पूर्णपणे थांबलेलं अर्थचक्र पुन्हा एकदा सुरू झालं. पण यात गोची झाली ती एक पडदा थिएटर्सची अर्थात सिंगल स्क्रीन्सची. मल्टिप्लेसमध्ये जे चित्रपट लागले त्यात मास अपील होतील असे चित्रपट नव्हते. सूरज पे मंगल भारी, रुही, इंदूकी जवानी असे काही चित्रपट लागले. पण त्याला उपस्थितीही यथातथाच होती. मल्टिप्लेससह सिंगल स्क्रीनला गरज होती ती सूर्यवंशी, राधे यांच्यासारखे चित्रपट थिएटरवर येण्याचे. कारण, रोहित शेट्टी, सलमान खान यांचे चित्रपट हे गर्दी खेचणारे असतात. सूर्यवंशी खरंतर 30 एप्रिलला येणार होता. पण महाराष्ट्रात लागलेल्या ब्रेक द चेनमुळे तो पुढे ढकलला गेला. सूर्यवंशी पुढे गेल्यामुळे इतर सगळेच सिनेमे होल्डवर गेले. राधे हा चित्रपटही पुढे जाईल की काय असं वाटत असताना, चित्रपटाचा ट्रेलर आला. आणि ठरल्यानुसार हा चित्रपट 13 मे ला ईदच्या दिवशी रिलीज होतो आहे. ट्रेलर येतानाच हा चित्रपट झी प्लेक्सवरही पाहता येणार आहे. या ओटीटीवर काही पैसे भरून हा चित्रपट लोकांना घरच्या घरी पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे थिएटर लॉबी मात्र नाराज झाली आहे. पण ही नाराजी व्यक्तही करता येत नसल्याची भावना काहींनी बोलून दाखवली. 


सिंगल स्क्रीन सिनेमा ओनर्स एंड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, थिएटर मालक आणि एक्झिबिटर्समध्ये नाराजी आहेच. कारण, गेल्या 14 महिन्यांपासून थिएटर्स बंद आहेत. ती एकदम सुरू करणं शक्य नाही. साफसफाई, दुरूस्ती या सगळ्या गोष्टी आहेत. शिवाय, व्यावसायाच्या नियम अटीही ठरवायला वेळ लागतो. 50 टक्के उपस्थितीत हा व्यवसाय होत नाही. सध्या देशातली 80 टक्के थिएटर्स बंद आहेत. आता राधे, सूर्यवंशी या सिनेमांकडून अपेक्षा आहेत. पण आता निर्माते थिएटरकडून आणि ओटीटीकडूनही मिळवतायत. हे मॉडेल यशस्वी झालं तर सिंगल स्क्रीन्सला भवितव्यच उरणार नाही. 


ठाण्यातल्या वंदना थिएटरच्या व्यवस्थापिका अनघा माने म्हणाल्या, राधे हा चित्रपट गर्दी खेचणारा आहे. गेल्या 14 महिन्यांपासून थिएटर्स बंद आहेत. निदान या चित्रपटाच्या निमित्ताने काहीतरी पुन्हा नव्याने सुरू होईल अशी आशा होती. पण आता 13 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होताना राज्यातली स्थिती काय असेल सांगता येत नाही. थिएटरला परवानगी दिली जरी तरी तो ओटीटीवर पाहता येणार आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे राधेच्या निर्मात्यांचंही बरोबर वाटतं. त्यांचा पैसा अडकून आहे. त्यामुळे ते शक्य तिथून गल्ला भरणार. अशात मरण सिंगल स्क्रीन्सचं आहे. 


राधे - युवर मोस्ट वॉण्टेड भाई हा सिनेमा लोकांना थिएटरमध्ये आणणारा चित्रपट आहे. पण ओटीटी आणि थिएटर अशा एकत्रित रिलीज करण्याची प्रॅक्टीस यशस्वी झाली तर वितरक, एक्झिबिटर, थिएटर मालक, मल्टिप्लेक्स हे सगळेच अडचणीत येतील. कारण, घरबसल्या चित्रपट पाहण्याची सुविधा मिळाल्यावर थिएटरमध्ये कोण येणार असा प्रश्न आहे.