Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाहेर रविवारी पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, दुसरीकडे या घटनेनंतर सलमान खान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता, या घटनेनंतर सलमान खान आपलं घर बदलण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा विचार करता सलमान खान आता गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जाणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.
मात्र, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या वृत्तात तथ्य नाही. सलमान खान आपलं सध्याचे राहते घर सोडणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या सलमान खान या ठिकाणी, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहणार आहे. सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी बदल करण्यात आले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सलमानची भेट घेत त्याला धीर दिला. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.
सलमानच्या घरात गोळी
या गोळीबारातील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसली असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गॅलरीतील पडद्यातून आरपार गेली आणि भिंतीवर लागली असल्याचे समोर आले.
गोळीबाराचा संबंध बिश्नोई गँगशी
गोळीबाराचा लॉरेन बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंध आहे. याआधी देखील बिश्नोई गँगकडून सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता, घराजवळ गोळीबार झाला.