Salman Khan House Firing : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. आता या तपासाला आणखी यश मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानचे वास्तव्य असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दोघांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही आरोपींना अटक केली आहे. आता, मुंबई पोलिसांना बिष्णोई गँगविरोधात मोठा पुरावा मिळाला आहे. 


सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी गँगस्टर लाँरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई हा प्रमुख आरोपी आहे. आता त्याच्याविरोधात महत्त्वाचा पुरावा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबई पोलिसांना अटक केलेल्या आरोपींकडून अनमोल बिष्णोईची ऑडिओ रेकोर्डिंग मिळाली होती. त्यानंतर अनमोलच्या आवाजाचा नमुना तपास यंत्रणेकडे असलेल्या आवाजाच्या नमुन्याशी जुळवून पाहिला. आवाजाचे हे नमुने जुळले असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे. 


अनमोल बिष्णोई होता थेट संपर्कात...


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून आणि तपासातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापासून ते  आरोपींनी अज्ञात ठिकाणी सुरक्षित आसरा घेण्यापर्यंत अनमोल बिष्णोई हा आरोपींच्या संपर्कात होता. आरोपींना गुजरातमधून अटक केल्यानंतर पोलिसांना मोबाईलमधून आरोपी आणि अनमोल बिष्णोई यांच्यातील ऑडिओ रेकोर्डिंग सापडले. 


एका अधिकाऱ्याने सांगितले की,  या ऑडिओमधील आवाज हा अनमोल बिष्णोई याचाच आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून अनमोल बिष्णोईच्या आवाजाच्या ऑडिओचे नमुने घेण्यात आले होते.त या दोन्ही आवाजाची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. फॉरेन्सिक तपासात तो आवाज हा अनमोल बिष्णोई याचा असल्याचे समोर आले आहे. 


मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांना शस्त्र पुरवल्याप्रकरणी 26 एप्रिल रोजी अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर यांना पंजाबमधून अटक केली. या प्रकरणी अटकेत असलेल्या अनुज थापन याने एक मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. तर, काही दिवसांनी या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद रफीक चौधरी याला अटक करण्यात आली होती. 


इतर संबंधित बातम्या :