Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं. फरार आरोपी लॉरेन्स बिश्नोई व त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी 1 हजार 735 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनीही एक आरोपपत्र दाखल केलेलं आहे.
सलमान खानच्या वांद्रे गॅलेक्सी इथल्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटेच्यावेळी हा हल्ला करण्यात आला होता. बिष्णोई टोळीच्या या गोळीबारानंतर देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. राज्यात बिष्णोई गँगला मुंबईत आपलं खंडणीच रॅकेट वाढवून दहशत माजवायची होती. त्यासाठीच सलमान खानकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशानेच बिष्णोई गँगकडून सलमानच्या घरावरती गोळीबार करण्यात आला. असं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बिश्नोई गँगच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे.
सहा आरोपींना अटक तर तिघे फरार घोषित
या आरोपपत्रांत अनेक कागदपत्रांसह 46 साक्षीदारांची साक्ष आणि सीआरपीसी कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी आरोपींचे नोंदविलेल्या जबाबांचाही समावेश आहे. मोक्का कायद्यांतर्गत आरोपींचा कबुली जबाब, 22 पंचनामेही व अन्य कागदपत्रही या आरोपपत्राला जोडण्यात आली आहेत. यात 6 आरोपींना अटक आरोपी तर 3 आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय.
बिश्नोईचा भक्कम पुरावा पोलिसांकडे
या प्रकरणात बिश्नोईचा सहभाग असल्याचं सिद्ध करणारा भक्कम डिजिटल पुरावाही पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. ज्यात पोर्तुगालमधून बिश्नोईनं शेअर केलेली फेसबुक पोस्ट आणि अनमोल बिश्नोई व अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील संभाषणाचे तीन ते पाच मिनिटांचे रेकॉर्डिंग, जे फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान अनमोल बिश्नोईच्या आवाजाच्या नमुन्यांशी मिळतेजुळते असल्याचे दिसते. लॉरेन्सच्या आदेशावरुन ही पोस्ट पोर्तुगालमधून अनमोल बिश्नोईने केली होती. अटकेतील आरोपी विकी गुप्ताच्या मोबाइलमध्येही ही पोस्ट सापडली होती.
बिष्णोई गँगमुळे माझं कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली - सलमान खान
सलमान खानला वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देऊन त्याच्या घरावरती गोळीबार करत खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सलमान खाननं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातही हा खंडणी उकळण्याचाच प्रयत्न असल्याचं म्हटलंय. "बिष्णोई गँगच्या या कृत्यांमुळे मी आणि माझं कुटुंब भीतीच्या वातावरणाखाली जगत आहोत", असंही सलमाननं मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलंय. साल 1998 मध्ये रिलिज झालेल्या 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटींग दरम्यान सलमान खाननं बिश्नोई समाजासाठी पूजनीय असलेल्या काळवीट हरणाची शिकार केली होती. त्यानंतर उदयास आलेल्या या टोळीच्या सलमान खान टार्गेटवर राहिलाय.