Salman Khan Birthday Special : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून भाईजानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज वाढदिवसानिमित्त भाईजान चाहत्यांना खास भेट देणार असल्याचं म्हटलं जात आहे.


सलमान खानच्या वाढदिवसाची चाहते प्रतीक्षा करत असतात. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अनेक चाहते दरवर्षी न चुकता भाईजानला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मोठे-मोठे पोस्टर्स घेऊन ते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर उभे असतात.


सलमान खान आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. बाल्कनीत येत तो चाहत्यांना भेटतो. सलमानने अनेकदा आपल्या वाढदिवशी आगामी सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे यंदाची भाईजानची ही भेट चाहत्यांना मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


2024 गाजवणार सलमान खान!


सलमान खानचे 2023 मध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. पण 2024 हे वर्ष भाईजानसाठी नक्कीच खास असणार आहे. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, 2024 मध्ये सलमानचे एक-दोन नव्हे तर पाच बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. भाईजान आज आपल्या वाढदिवसानिमित्त या सिनेमांची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


'या' सिनेमांची घोषणा करणार सलमान खान?


करण जोहर आणि सूरज बडजात्या यांच्या आगामी सिनेमात सलमान खान काम करणार आहे. तसेच यशराज फिल्म्सच्या 'टायगर वर्सेस पठाण' या सिनेमातही करण जोहर दिसणार आहे. शाहरुख खान आणि सलमान एका सिनेमात काम करणार आहेत. 25 वर्षांनंतर सलमान खान आणि करण जोहर एकत्र काम करणार आहेत. 'दबंग 4' आणि 'किक 2' या सिनेमांची सलमान खान घोषणा करू शकतो, असे म्हटले जात आहे. 


सलमान खानचं पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सलमानची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 'मैंने प्यार किया' या सिनेमाने खऱ्या अर्थाने त्यांना लोकप्रियता मिळाली. सलमानच्या सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 2024 मध्ये सलमान खान बॉक्स ऑफिस गाजवणार असे म्हटले जात आहे.


संबंधित बातम्या


Happy Birthday Salman Khan : सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल