मुंबई : 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरो बानो यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचा कंटाळा आल्याची उद्विग्नता सायरो बानोंनी ट्वीटमधून व्यक्त केली.


भूमाफिया समीर मोटवानी यांच्यापासून दिलीप कुमार यांचा बंगला वाचवण्यासाठी सायरा बानो यांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली आहे. नरेंद्र मोदीच आपली शेवटची आशा आहेत, असं म्हणत सायरा बानो यांनी मदतीची याचना केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनांचा कंटाळा आल्याचंही सायरो बानोंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे ट्वीट?

'सायरा बानो यांच्याकडून विनंती : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुमच्या भेटीची वेळ मिळण्याची वाट पाहत आहे.  'मी प्रयत्न करतोय' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाचा आता कंटाळा आला आहे. दिलीप साहेबांचं एकमेव घर भूमाफिया समीर भोजवानीपासून वाचवण्यासाठी तुम्ही शेवटची आशा आहात. मी मदतीची भीक मागते.' असं ट्वीट सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर केले आहे.

समीर भोजवानीविरोधात लढताना आपल्या भावाने मदत केली. मात्र त्याने दिलेल्या त्रासाचा ताण असह्य झाल्याने आपल्या भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, असंही सायरा बानो यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

दोनच दिवसांपूर्वी समीर भोजवानीची तक्रार सायरा बानोंनी पंतप्रधानांकडे ट्विटरच्या माध्यमातून केली होती. 'भूमाफिया समीर भोजवानी तुरुंगातून सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. भोजवानीकडून दिलीप कुमार यांना धमक्या दिल्या जात आहेत, पैसा आणि बळाचा वापर करुन घाबरवलं जात आहे' अशी तक्रार त्यांनी केली होती.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील पाली हिल्स भागात दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या जागेवर समीर भोजवानीने दावा केला आहे. भोजवानीने धमकावून या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सायरा बानोंनी केला आहे. सायरा बानोंनी यापूर्वीही भोजवानीविरोधात पोलिसात तक्रार केली होती.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिनयात समीर भोजवानीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याला अटकही झाली होती.