स्नेहा उल्लालने आपल्याला रक्ताशी निगडीत गंभीर आजार झाल्याचं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. या आजाराला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हटलं जातं. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला खूप अशक्तपणा येतो. या व्यक्ती स्वतःच्या पायांवर 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त काळ उभ्या राहू शकत नाहीत. आता अभिनेत्री म्हटलं, की सलग कितीतरी वेळ शूटिंगसाठी उभं राहावं लागतंच. कधी नाचावं लागतं, तर कधी दिग्दर्शकाच्या मनाप्रमाणे सीन होण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. त्यामुळे स्नेहाने सिने इंडस्ट्रीतून संन्यास घेतला.
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लकी- नो टाईम फॉर लव्ह' सिनेमातून स्नेहाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर ती आर्यन (2006), जाने भी दो यारों (2007), काश मेरे होते (2009), आणि क्लिक (2009) अशा सिनेमांमध्ये काम केलं. मात्र लकीनंतर स्नेहा सलमानसोबत पुन्हा झळकली नाही.
मला कधीच चित्रपटात काम करायचं नव्हतं, अशी कबुलीही स्नेहाने दिली होती. सलमान खानने मला सिनेमात काम करण्याची संधी दिल्यामुळे मी नकार देऊ शकले नाही, असंही ती म्हणाली होती. चित्रपटात अभिनयाला सुरुवात केल्यानं तिचं शिक्षणही बंद झालं होतं.
स्नेहाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अनेक वर्षांच्या गॅपनंतर ती चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. टॉलिवूडमधील चित्रपटातून स्नेहा पुन्हा सिनेसृष्टीत येत आहे. स्नेहाने मात्र याला 'पुनरागमन' किंवा 'कमबॅक' म्हणण्यास आक्षेप घेतला आहे. आजारपणामुळे मी ब्रेक घेतला होता, मी सिनेविश्व सोडलं नव्हतं, असं स्नेहा म्हणते. ते काहीही असलं, तरी स्नेहाचा नव्या चित्रपट येऊ घातल्यामुळे तिचे चाहते मात्र आनंदात आहेत.