मुंबई : बॉलिवूड गायक सोनू निगम याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'मी भारतापेक्षा पाकिस्तानात जन्मलो असतो तर बरं झालं असतं,' असे तो म्हणाला आहे. भारतीय गायकांसोबत होणाऱ्या दुजाभावाबद्दल या विधानाद्वारे त्याने नाराजी व्यक्त केली आहे.


आपल्या देशात भारतीय गायकांना गाण्यासाठी म्यूझिक कंपन्याना पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही पैसे दिले नाही तर ते तुमचं गाणं वाजवणार नाही. त्यासोबतच तुम्हाला गाणंही मिळू देणार नाही. मात्र पाकिस्तानी गायकांसोबत असं केलं जात नाही. त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाही. मग भारतीय गायकांसोबतच असा दुजाभाव का? अशी खंत सोनू निगमने एका मुलाखती दरम्यान बोलून दाखवली.

सोनूने भारतीय गायकांच्या समस्यांची यादीच समोर ठेवली. तो म्हणाला, "पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा माझ्या छोट्या भावासारखा आहे. तो गातो ही चांगला, पण म्यूझिक कंपन्या त्याच्याकडून पैसे घेत नाही. गाण्यासाठी पैसे दे, असे राहत फतेह अली खानला कोणी म्हणत नाही . मी पाकिस्तानी गायकांची यादी देऊ शकतो ज्यांच्याकडून पैसे घेतले जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी भारतापेक्षा पाकिस्तानात जन्मलो असतो तर बरं झालं असतं. कारण मला भारतात चांगलं काम मिळालं असतं, माझ्याकडून पैसे घेतले गेले नसते."

या विधानामुळे सोनू निगम सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.