लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. काँग्रेसच्या प्रचारासाठी लातूरमध्ये बॉलिवूड अभिनेता आणि जिल्ह्याचा सुपूत्र रितेश देशमुखचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.

लातूर शहरातील तरुणाईने रोड शोसाठी मोठी गर्दी केली होती. लातूर शहरातील विविध भागातून ही लॅली काढण्यात आली. शहरातील अनेक उमेदवार आणि रितेश देशमुख यांचे बंधू आमदार अमित देशमुखही यावेळी हजर होते.

राजकारण मला कळत नाही, मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असं मत रितेश देशमुखने रोड शोवेळी व्यक्त केलं. काँग्रेसने लातूर महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आपला गड राखण्याचं आव्हान अमित देशमुख यांच्यावर असणार आहे.

दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या तीन महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी होईल.

लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70

  • राष्ट्रवादी काँग्रेस- 13

  • काँग्रेस- 49

  • शिवसेना- 06

  • रिपाइं- 02


परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

  • राष्ट्रवादी काँग्रेस- 30

  • काँग्रेस- 23

  • शिवसेना- 8

  • भाजप- 2

  • अपक्ष- 2


चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

  • काँग्रेस- 26

  • भाजप- 18

  • शिवसेना- 5

  • राष्ट्रवादी- 4

  • मनसे- 1

  • बीएसपी-1

  • अपक्ष- 10

  • भारिप बहुजन महासंघ- 1


सध्या चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर आहे. पालिकेतील सत्ता सर्वपक्षीय आहे. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. माजी खासदार नरेश उगलीया यांचा गट तर रामू तिवारी यांचा दुसरा गट आहे. रामू तिवारी यांच्या गटातील 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महापौर भाजपचा आहे.